ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - दिल्लीत सत्तास्थापनेसाठी भाजपने सुरु केलेला घोडेबाजार आम आदमी पक्षाच्या स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाला आहे. आपचे आमदार दिनेश मोहनिया यांना भाजप नेत्यांनी तब्बल चार कोटी रुपयांची ऑफर देतानाचे स्टिंग ऑपरेशन आपने सोमवारी जाहीर केले. सत्तेसाठी पैसे उधळणा-या भाजपाला कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत सत्तास्थापन करु देणार नाही असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.
दिल्लीत सत्तास्थापनेसाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरु असून विधानसभेत बहुमत मिळावे यासाठी भाजपने आपच्या काही आमदारांशी संपर्क साधला होता. हा सर्व प्रकार आपने कॅमे-यात कैद केला आहे. सोमवारी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पर्दाफाश हे स्टिंग ऑपरेशन जाहीर केले. या स्टिंग ऑपरेशनमध्ये भाजपचे दिल्लीतील उपाध्यक्ष शेरसिंह डागर आम पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांना चार कोटी रुपयांची ऑफर देताना दिसत आहेत. दिनेश मोहनिया यांनी आता राजीनामा द्यावा व त्यानंतर पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी त्यांना पक्षाकडून आर्थिक पाठबळ दिले जाईल असे आश्वासनही डागर यांनी दिले होते. आपच्या आमदारांनी राजीनामा दिल्यास विधानसभेत आपचे संख्याबळ कमी होईल व भाजपच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होईल अशी त्यांनी खेळी होती.
तसेच निवडणुकीत पराभव झाल्यास एखाद्या मंडळाच्या अध्यक्षपगावर तुमची वर्णी लावू असे डागर यांनी मोहनिया यांना सांगितले होते. हे पुरावे सुप्रीम कोर्टासमोर सादर करु असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. भाजपने दिल्लीवासियांना धोका दिला असा आरोपही केजरीवाल यांनी केला.
-------
डागर यांनी आरोप फेटाळले
आपच्या स्टिंग ऑपरेशननंतर डागर यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेत आपने केलेले आरोप फेटाळून लावले. आपचे आमदार दिनेश मोहनिया हे स्वतःहून माझ्याकडे आले होते. आपला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये यायची इच्छा असल्याचे मोहनिया यांनी मला सांगितले होते असे डागर यांनी सांगितले. याविषयी वरिष्ठांशी बोलून निर्णय घेऊ असे मी मोहनिया यांना सांगितले होते. भाजपने यासंदर्भात माझी चौकशी करावी, मी माझी बाजू पक्षासमोर मांडीन असेही मोहनिया यांनी स्पष्ट केले. मी कोणालाही पैशांची ऑफर दिली नसून आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून सन्यास घेऊन असेही डागर यांनी नमूद केले.