ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - अवघ्या देशभराचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला भक्कम आघाडी मिळाली आहे. दिल्लीत आप तब्बल ६७ जागांवर आघाडीवर असून भाजपा फक्त ३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही.
उत्कंठा वाढविणा-या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा फैसला आज होत आहे. राजधानीतील तख्तासाठी भाजपा आणि आम आदमी पार्टी यांच्यात थेट लढत आहे. सकाळी ८ वाजता १४ केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. दिल्लीतील ७० जागांसाठी ६७३ उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीतील ६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.विविध वाहिन्यांच्या एक्झिट पोल्समध्ये आम आदमी पक्षाला कौल देण्यात आला होता. अपेक्षेप्रमाणे मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यापासून आम आदमी पक्षाने आघाडी घेतली. मतमोजणीच्या तासाभरानंतरच आपने बहुमताचा आकडा ओलांडत भाजपाला धक्का दिला. भाजपाच्या उमेदवार किरण बेदी या कृष्णानगर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तर चांदनी चौक या मतदारसंघात भाजपाच्या वाटेला फक्त ९१ मतं आली असून या मतदारसंघात भाजपा सध्या तिस-या स्थानावर आहे. विशेष बाब म्हणजे याच मतदारसंघाने लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नेते डॉ. हर्षवर्धन यांना भरभरुन मतं दिली होती.
भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी, काँग्रेसचे उमेदवार अजय माकन, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी या पराभवाच्या छायेत आहे. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदीया, सोमनाथ भारती हे नेते विजयाच्या दिशेने आगेकूच करत आहेत. दिल्लीत घवघवीत यश मिळाल्यावर अरविंद केजरीवाल हे १४ फेब्रुवारीरोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीरोजीच केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आता वर्षभराने ते पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. रामलीला मैदानात हा शपथविधी सोहळा होणार आहे.