- प्रमोद गवळी, नवी दिल्ली
पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा विजय पक्का आहे. त्यानंतर गोवा व गुजरात हे ‘आप’चे पुढचे लक्ष्य आहे, असे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. या तिन्ही राज्यांतील जनता सत्तारुढ पक्षांपासून निराश आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची पाळेमुळेही कमजोर होत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये अनुकूल परिस्थिती आहे, असे ते म्हणाले. केजरीवाल यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांच्याशी चर्चा केली. यावेळी पंजाब, गोवा व गुजरात विधानसभा निवडणुकीत अवलंबिण्यात येणाऱ्या रणनीतीचे काही पत्तेही केजरीवाल यांनी उघड केले. गोवा विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनविण्याचा विचार सुरू असल्याचे असे सांगून ते म्हणाले, गुजरातमध्ये दोन पक्षांमध्ये मतांचे ध्रुवीकरण झाले आहे. विरोधी भूमिकेत काँग्रेस कमजोर पडत असून, भाजपाला लोक कंटाळले आहेत. ‘आप’च्या २१ आमदारांना संसदीय सचिव बनविण्यात आल्याच्या वादावर ते म्हणाले : निवडणूक आयोगाद्वारे या आमदारांना अपात्र घोषित केले जाऊ शकते. परंतु कायदेशीरदृष्ट्या आमची केस मजबूत आहे. न्यायालयातून स्थगनादेश मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. या चर्चेच्या वेळी केजरीवाल यांच्यासोबत दिल्लीचे ऊर्जा आणि परिवहनमंत्री सत्येन जैन आणि लोकमत मीडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक करण दर्डा उपस्थित होते.महाराष्ट्रातील ‘आप’च्या भवितव्याबाबत केजरीवाल म्हणाले, ‘महाराष्ट्रात आमचा पक्ष आजही योग्य मराठी चेहऱ्याचा शोध घेत आहे. पक्षासमक्ष अनेक नावे होती. त्यातील एक नाव नाना पाटेकर यांचे होते.’ अनेक पक्षांमध्ये मतांचे विभाजन झालेले असल्याने तेथे पाय रोवणे एवढे सोपे नाही.