श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत असलेल्या काश्मीरमधील गुरेज खो-यात जाऊन तेथे सीमेचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी चारही वर्षी दिवाळी जवानांसोबत साजरी करण्याचा रिवाज कटाक्षाने पाळला आहे. काश्मीरमध्ये त्यांनी अशी साजरी केलेली ही दुसरी दिवाळी होती. याआधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच काश्मीरमध्ये भयंकर पुराने वाताहत झाली, तेव्हा लष्कराने केलेल्या शर्थीच्या मदत आणि बचावकार्याबद्दल मोदींनी दिवाळीनिमित्त भेट देऊन पाठीवर शाबासकीची थाप दिली होती.सीमेवर दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधानांसोबत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्ट. जनरल देवराज अनबू व चिनार कॉर्पस्चे प्रमुख लेफ्ट. जनरल जे. एस. संधू हेही होते. मोदींनी जवानांना मिठाई वाटून त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या.नंतर लष्करी तळावर जवानांसमोर केलेल्या छोटेखानी भाषणात पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करावी, असे वाटत असते. मलाही तसेच वाटते व म्हणूनच मी मुद्दाम येथे आलो आहे. कारण देशाच्या सीमांचे रक्षण करणारे शूर जवान हे माझे कुटुंबीयच आहेत, असे मी मानतो. अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीतही मोठ्या धीराने मातृभूमीचे रक्षण करणाºया जवानांविषयी पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांना भेटून गप्पा मारल्या की कामासाठी नवा हुरूप येतो, असे ते म्हणाले.सैन्यदलांच्या गरजा आणि सैनिकांचे कल्याण यासाठी सरकार सदैव तत्पर असल्याची खात्री पंतप्रधानांनी दिली आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेला ‘वन रँक वन पेन्शन’चा विषय सरकारने मार्गी लावल्याचा त्यांनी उल्लेख केला. सन २०२२ मध्ये साज-या केल्या जाणा-या भारतीय स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त इतर नागरिकांप्रमाणेच सैन्यदलातील सदस्यांनीही देशासाठी काही तरी नवे करण्याचा संकल्प करावा, असे त्यांनी आवाहन केले. नव्या कल्पना आणि नेहमीचे काम करण्याच्या नव्या पद्धती यांचे लष्कर दिन, नौदल दिन व हवाईदल दिन या दिवशी आवर्जून कौतुक केले जाते, याचाही त्यांनी उल्लेख केला.त्याआधी पंतप्रधानांनी आपल्या अधिकृत टिष्ट्वटर हॅण्डलवर स्वत:ची स्वाक्षरी असलेले शुभेच्छा कार्ड टाकून देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. या पावन सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाचे आयुष्य सुखसमृद्धी व उत्तम आरोग्याने उजळू दे आणि सर्वत्र आनंद असू दे, अशा शुभकामना त्यांनी व्यक्त केल्या. (वृत्तसंस्था)व्यग्र दिनचर्येतही योगाभ्यासकष्टाच्या आणि व्यग्र दिनचर्येतही मुद्दाम वेळ काढून जवान योगासने करतात, असे सांगितल्यावर मोदींनी त्याविषयी समाधान व्यक्त केले. योगाभ्यासाने जवान आपले कर्तव्य अधिक चोखपणे पार पाडू शकतील व त्यामुळे त्यांना मानसिक शांतीही मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवृत्तीनंतर हे जवान उत्तम योगप्रशिक्षक म्हणून काम करू शकतील, असेही ते म्हणाले.
तुमच्या भेटीने कामाला नवा हुरूप येतो, मोदी यांची जवानांसोबत दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 1:57 AM