पाटणा- आकाश कुमार या 19 वर्षीय तरूणाने गर्लफ्रेण्डबरोबर व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलवर बोलत असताना आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. देशीकट्ट्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून त्याने आत्महत्या केली. पाटण्यातील साईचकमधील राहत्या घरी सोमवारी त्याने आत्महत्या केली आहे.
सोमवारी मध्यरात्री तीन वाजत घरी एकटा असताना आकाशने हे पाऊल उचललं. आत्महत्या करते वेळी तो त्याच्या गर्लफ्रेण्डशी व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलवर बोलत होता. आकाशची गर्लफ्रेण्ड इयत्ता नववीत शिकत असून ती महावीर कॉलनीमध्ये राहते. आकाश गेल्यावर्षी परीक्षेत नापास झाला होता तसंच तो एका बायकर्स ग्रुपमध्ये सामितलही झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून 9एमएम देशीकट्टा,मोबाइल जप्त केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आकाश व्हिडीओ कॉलवर बोलत असताना त्याने अचानक पिस्तुल बाहेर काढली. मी त्याला लगेचच पिस्तुल बाजूला करायला सांगितली, असं आकाशच्या गर्लफ्रेण्डने पोलिसांना सांगितलं आहे. आकाशचे वडील त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होते. आकाशच्या गर्लफ्रेण्डच्या वडिलांचे गुन्हेगारी विश्वाशी संबंध असल्याने आकाशच्या वडिलांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. काही दिवसांपूर्वीच आकाशच्या वडिलांनी त्याला मुलीबरोबरच्या नात्यावरून शिवीगाळ करत खडसावलं होतं. यासगळ्यामुळे आकाश दुःखी होता. मुलीच्या घरीही तशीच परिस्थिती होती. तिच्या घरीही आकाशबरोबरच्या नात्यामुळे वाद झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आकाशने घरी घडलेला सर्वप्रकार त्याच्या गर्लफ्रेण्डला चॅटवर सांगितला. त्यानंतर तिला शेवटचं बघायचं असं सांगून व्हिडीओ कॉलवर बोलावलं, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. मी आत्महत्या केली तर माझे घरचे त्याकडे लक्षही देणार नाहीत, असं आकाशने त्याच्या गर्लफ्रेण्डला सांगितलं असल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. मोबाइल फोन पायावर ठेवून आकाशने स्वतःला ब्लॅन्केटमध्ये गुंडाळलं व बेडवर झोपून त्याने गोळी झाडून घेतली. घटनेनंतर आकाशच्या गर्लफ्रेण्डने लगेचच आकाशचा चुलत भाऊ चंदन कुमारला फोन केला. घराच दार बंद असल्याने चंदनने सकाळी पाच वाजचा गच्चीतून कसाबसा घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान, आकाशने व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल सुरू असताना गोळी झाडून आत्महत्या केल्याचं त्याच्या गर्लफ्रेण्डने पोलिसांना सांगितलं आहे. पोलिसांनी त्याची नोदं केल्याची माहिती बुर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आलोक कुमार यांनी दिली आहे. आकाशचे वडील संजय कुमार राय यांनी अज्ञाताविरोधात मुलाला मारल्याची तक्रार दाखल केली आहे. घरचा दरवाजा आतून बंद असताना मुलाची हत्या होणं अशक्य आहे, असं पोलिसांचं मत आहे. फॉरेन्सिक विभागने घटनास्थळावरून वस्तू तपासासाठी जमा केल्या आहेत.