काँग्रेसचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात वादग्रस्त ट्विट, सोशल मीडियावर टीकेचा भडीमार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 08:21 AM2017-11-22T08:21:01+5:302017-11-22T17:36:50+5:30
काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवणं स्वतःच्याच अंगलट आल्याचे पाहायला मिळाले.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवणं काँग्रेसच्याच अंगलट आल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसनं ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, मात्र या जाळात काँग्रेस स्वतःच अडकल्याचे दिसत आहे. काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात एक वादग्रस्त पोस्ट मंगळवारी (21 नोव्हेंबर) ट्विटरवर शेअर करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे या तिघांच्या फोटोवर आधारित एक मीम पोस्ट ट्विटरवर पोस्ट करण्यात आली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चहा विकण्यावर खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
भारतीय युवा काँग्रेसच्या 'युवा देश' या ऑनलाइन नियतकालिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना हे अपमानास्पद तसंच वादग्रस्त 'मीम' तयार केले आहे. दरम्यान, सोशल मीडियातून टीकेचा भडिमार झाल्यानंतर हे वादग्रस्त ट्विट डिलिट करण्यात आले.
'मीम'मध्ये नेमका काय आहे मजकूर?
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यातील संभाषणाचे मीम तयार करण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, 'विरोधीपक्ष आपल्यावर कशा पद्धतीचे मेमे बनवतात, असे सांगत आहेत. तर त्याला मेमे नाही तर मीम म्हणतात असे ट्रम्प यांनी मोदीं सांगितले. तर थेरेसा मे मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना 'तुम्ही चहाच विका' असे अपमानास्पद व वादग्रस्त मीम तयार करण्यात आले. काँग्रेसची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चौफेर टीका होऊ लागली. त्यानंतर काँग्रेसनं तातडीने हे ट्विट डिलीट केलं.
Official handle of Indian Youth Congress's online magazine Yuva Desh deletes derogatory tweet against PM Narendra Modi pic.twitter.com/dWoIU6RmH2
— ANI (@ANI) November 21, 2017