UP Assembly Election: उत्तर प्रदेशात आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. पहिल्या टप्प्यात यूपीच्या पश्चिम भागातील एकूण ५८ विधानसभा मतदार संघांसाठी आज मतदान होत आहे. तरुणाईपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहे. मतदारांमध्ये एक वेगळीच क्रेज पाहायला मिळत आहे. कुणी नवरदेव आपली वरात सोडून आधी मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचला आहे. तर कुणी आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहे. पण यासगळ्यात एक मतदारानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
नोएडाच्या एका मतदान केंद्रावर भगवी वस्त्र परिधान केलेला एक व्यक्ती मास्क लावून मतदान केंद्रावर मतदान केंद्रावर पोहोचला आणि उपस्थितांच्या चेहऱ्यावर गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच मतदानाला पोहोचले की काय असा गैरसमज या वेशभूषाधारी मतदारामुळे मतदान केंद्रावरील पोलीस अधिकाऱ्यांना झाला. पण या तरुणानं मास्क खाली केल्यानंतर तो सामान्य मतदार असून योगी आदित्यनाथ यांचा चाहता असल्याचं लक्षात आलं.
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या वेशभूषेत मतदान करायला पोहोचलेल्या या मतदाराचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. मतदान केंद्रावर त्यावेळी प्रत्येकाला असं वाटलं की खुद्द योगीच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले की काय. या मतदाराचं नाव राजू कोहली असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे राजू कोहली जसा चालू लागला तसं त्याच्या मागून भाजपाचे समर्थक देखील चालू लागले. मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनाही सुरुवातीला धक्काच बसला. पण सत्य लक्षात आल्यानंतर तेही चक्रावून गेले. याचा व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेनं देखील ट्विट केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३२ हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांना त्यावर प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली आहे.