उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. महोबा जिल्ह्यात एका तरुणाने फेसबुक पोस्ट लिहून आत्महत्या केल्य़ाची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाने फेसबुक पोस्टमध्ये आत्महत्येचा उल्लेख केला होता. काही महिन्यांपूर्वीच तरुणाचा विवाह झाला होता. तरुणाच्या आत्महत्येबद्दल समजताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महोबा जिल्ह्यातील कबरई पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भागात ही घटना घडली. झाशी-माणिकपूर रेल्वे रुळावर संजय कुशवाहा नावाच्या तरुणाने आत्महत्या केली. तो आंबेडकर नगरमध्ये राहत होता. फेसबुकवर सुसाईड नोट पोस्ट करून संजय घरातून अचानक निघून गेला होता.
संजयची फेसबुक पोस्ट पाहून कुटुंबीय घाबरले. त्यांनी गावभर संजयचा शोध घेतला. मात्र संजय सापडला नाही. याच दरम्यान एका तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळांवर सापडल्याचं त्यांना समजलं. संजयचा भाऊ विनोदनं मृतदेह सर्वप्रथम पाहिला. कपडे आणि अन्य साहित्य पाहून त्याने मृतदेह संजयचाच असल्याचं ओळखलं.
दहा महिन्यांपूर्वी संजयचा विवाह झाला होता. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. संजयने कुटुंबियांना कधीच कोणत्या त्रासाबद्दल सांगितलेलं नव्हतं. संजयच्या आत्महत्येबद्दल समजताच पत्नी आणि आईला धक्का बसला. आत्महत्येआधी संजयने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. मी माझ्या आनंदासाठी आत्महत्या करत आहे. यात कोणाचाच दोष नाही. माझं कुटुंब आत्महत्येला जबाबदार नाही, असं संजयने पोस्टमध्ये म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.