तरुण रोज साडेसात तास इन्स्टा, FB वर; संसद घुसखोरीचे बेरोजगारी हे प्रमुख कारण : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 05:53 AM2023-12-23T05:53:17+5:302023-12-23T05:53:51+5:30
१४६ सदस्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर या विरोधात इंडिया या विरोधी पक्षाच्या आघाडीच्या वतीने शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी सभागृहात उडी मारणे, ही नक्कीच सुरक्षेतील त्रुटी आहे; परंतु यामागचे कारण बेरोजगारी आहे. केंद्र सरकारने या तरुणांना रोजगार दिला नाही. त्यांना एकच मार्ग दिला आहे की, मोबाइलवर इन्स्टाग्राम दररोज साडेसात तास पाहत राहा. त्यामुळे हे तरुण संसदेत उडी मारून आले, अशा शब्दांत काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सरकारवर टीका केली आहे.
१४६ सदस्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर या विरोधात इंडिया या विरोधी पक्षाच्या आघाडीच्या वतीने शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
केंद्र सरकारने विरोधी पक्षांचे १४६ खासदार निलंबित करून केवळ त्यांचा अपमान केला नाही, तर देशातील ६० टक्के जनतेचा आवाज बंद केला आहे. देशात प्रचंड बेरोजगारी आहे. देशातील तरुणांना आज रोजगार मिळत नाही. मी एक छोटा सर्व्हे केला, त्यातील अभ्यासाने मी हैराण झालो. देशातील तरुण फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्टिटर, फेसबुक आणि मोबाइलवर रोज ७.३० तास घालवत आहेत. देशातील तरुणांचा रोजगार हिसकावून घेतल्याने तरुणांवर ही वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लोकशाहीसाठी किंमत मोजण्याची तयारी : पवार
देशाची संसद आणि लोकशाही वाचविण्यासाठी जी काही किंमत द्यावी लागेल ती मोजण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व राजकीय पक्ष तयार आहेत, अशा विधानासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जंतरमंतर येथील आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये जोश निर्माण केला.