काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशातील प्रत्येक तरुणाला आता समजलं आहे की, भारतीय जनता पार्टी (भाजपा) रोजगार देऊ शकत नाही असा दावाही केला आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भारतात जितके बेरोजगार आहेत. त्यापैकी 83 टक्के बेरोजगार तरुण आहेत. 2000 मध्ये एकूण बेरोजगारांमध्ये सुशिक्षित तरुणांचा वाटा 35.2 टक्के होता."
"2022 मध्ये हा 65.7 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, म्हणजे जवळपास दुप्पट झाला" असं ट्विटमध्ये प्रियंका यांनी म्हटलं आहे. तसेच दुसरीकडे पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणत आहेत की, सरकार बेरोजगारीची समस्या सोडवू शकत नाही. हे भाजपा सरकारचे सत्य आहे. आज देशातील प्रत्येक तरुणाला भाजपा रोजगार देऊ शकत नाही हे समजलं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसच्या निवडणुकीतील आश्वासनांचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, "तरुणांना रोजगार देण्यासाठी काँग्रेस पक्षाची ठोस योजना आहे. 30 लाख रिक्त सरकारी पदे तत्काळ भरली जातील, प्रत्येक पदवीधर/पदवीकाधारकाला वार्षिक 1 लाख रुपये प्रशिक्षणार्थी, पेपर फुटीविरोधात नवीन कठोर कायदा आणला जाईल आणि स्टार्ट-अपसाठी 5000 कोटी रुपयांचा राष्ट्रीय निधी तयार केला जाईल. काँग्रेस सरकार रोजगार क्रांतीच्या माध्यमातून देशातील तरुणांचे हात बळकट करेल. तरुण हे देशाचे भविष्य आहेत. ते बलवान असतील तर देश मजबूत होईल."