यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांसह तरुणाईचा जोश पाहायला मिळाला. या निवडणुकीत तरुणाईची मते निर्णायक ठरली आणि देशात पुन्हा एकदा मतदारांनी पंतप्रधानपदाची धुरा नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविली. नरेंद्र मोदींनी प्रचारादरम्यान तरुणांना मतदान करण्याची साद घातली होती, ती निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्याचे समजते.
तरुणाईने आणि जनतेने 'फिर एक बार मोदी सरकार' म्हणत नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे. एकट्या भाजपाला ३०३, तर एनडीएला ३५३ जागा मिळाल्यात. या बहुमताच्या जोरावर ठरवलं तर काहीही करता येऊ शकतं. स्वाभाविकच, मोदी सरकारकडून प्रचंड अपेक्षा आहेत. नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळासोबत आज शपथ घेणार आहेत. हे 'नमोपर्व' सुरू होत असताना तरुणाईशी साधलेला संवाद...
शास्त्र सांगत यथा राजा तथा प्रजा. मग प्रश्न आहे मोदीजींनी विकास केला की भाजपा सरकारने? अर्थात पंतप्रधान म्हणून त्यांचे मार्गदर्शन होते म्हणूनच हे सरकार पुन्हा आले आहे. 'फिर एक बार' ही उक्ती असंच सांगते पुन्हा एकदा याचा अर्थ पुन्हा पुन्हा दर पाच वर्षांनी हेच सरकार येईल असा नाही तर जनतेने या सरकारला अजून एक संधी दिली आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेली विकासाची वाटचाल उल्लेखनीय आहे. परंतू याचा अर्थ विरोधक विकास करत नाही किंवा करणार नाही असा घेऊ शकत नाही. आलेलं सरकार हे सर्वस्वी भाजपाचे आहे का? की हा विजय महायुतीच्या आधारावर आहे हा एक प्रश्नच आहे? अर्थात सरकार कोणतही असो नेता कोण आहे हे महत्वाचं. पुढील पाच वर्षात सरकारने स्त्री संरक्षण, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गरिबी, पाणी समस्या यावर विचार करून मार्ग काढावा.
- सिद्धी म्हात्रे
देशात पुन्हा एकदा NDA सरकार स्थापन झालं, NDA ला मतदारांनी बहुमत दिलं, याचा अर्थ मोदींच्या नेतृत्वावर अजूनही जनतेचा भरवसा आहे. 2014 ला महागाई, भ्रष्टाचाराने होरपळलेली जनता सरकार बदलाच्या अपेक्षेत होती, आणि मोदींच्या रूपाने मतदारांनी तो बदल घडवून आणला चांगले दिवस पाहण्यासाठी. रोजगार, शेतमालाला दीड पट हमीभाव, आणि प्रमुख काही सोयी पुरवण्याचं आश्वासन जनतेला मिळालं होतं , त्या आश्वासनांची पूर्तता कितपत झाली माहिती नाही. कदाचित माझ्या वा माझ्यासारख्यांपर्यंत पूर्णपणे ती पोहचली नाहीत. 2019 ला पुन्हा आश्वासनं देऊन आशेचा किरण दाखवणारं इतर कोणी दिसलंच नाही पुढे मग 'बुडणाऱ्याला काठीचा आधार' या नियमांनं पुन्हा मोदी साहेबांनाच जनतेनं कौल दिला. त्यामुळे निदान या 5 वर्षात तरी ही आश्वासनं पूर्ण झालेली पाहायला मिळावीत , ही या पाच वर्षात सरकारकडून अपेक्षा आहे.
- सुमित सावंत
तरूणाई राजकारणात पडत नाही याचा अर्थ ते डोळेझाक करतात असा होत नाही. सरकार कोणाचही आलं तरी सर्वसामान्यांच्या आयुष्यात फारसा फरक पडत नाही. यावेळी पुन्हा एकदा मोदी सरकार आलं आहे. मागच्या पाच वर्षात डिजिटल इंडियामुळे सकारात्मक बदल झाला. त्यामुळे येत्या पाच वर्षातही देशात आणखी काही सकारात्मक बदल व्हावेत ही लोकांची अपेक्षा आहे. नरेंद्र मोदींसारख्या कर्तव्यदक्ष पंतप्रधानांमुळे विकास होतोय. त्यामुळेच पुन्हा एकदा मोदी सरकार.
- वर्षा पाटील
आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. सैन्यदल, हवाईदल यांसंदर्भात योग्य निर्णय तसेच अत्याधुनिक सोयीसुविधेसाठी पुढाकार घ्यावा. बेरोजगारी, गरिबी यासह देशात असलेल्या समस्येचा गांभीर्याने विचार करावा. जनतेने विश्वासान सरकारला निवडून दिले आहे. त्यामुळे सरकारने ही प्रामुख्याने जनतेच्या हिताकडे लक्ष द्यावे.
- मृणाल सावंत
अब की बार मोदी सरकार असं म्हणत जनतेने पुन्हा एकदा भाजपाला निवडून दिले. विकासाच्या केवळ चर्चा होतात. पण आता खरंच लोकांना विकास अपेक्षित आहे. त्यामुळेच जिंकून आलेल्या नेतेमंडळींनी लोकांच्या हिताचा नक्कीच विचार करावा. बेरोजगारी ही सध्याच्या तरुणांसाठी एक समस्या आहे. त्यामुळे सरकारने रोजगारासाठी काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मोदी सरकारला आणखी पाच वर्ष विकास करण्याची संधी लोकांनी दिली आहे. त्यामुळे त्यांनीही देशाला भेडसावणाऱ्या समस्यांवर लवकरात लवकर उपाय शोधावेत.
- वैभव सकपाळ