वाराणसी : कोरोना व्हायरस आता नात्यांमधील जिव्हाळ्याचीही जाणीव करून देऊ लागला आहे. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातीलवाराणसीत घडला. मुंबईत काम करणारा एक तरून लॉक डाऊन होताच आपल्या 6 मित्रासह पायपीट करत घरी गेला. मात्र तो घरी पोहोचल्यानंतर कोरोनाच्या भीतीने ना आईने दरवाजा उघडला, ना भाऊ आणि वहिणीने. जवळपास 1600 किमीची पायपीट केल्याने या तरुणाची प्रकृतीही खालावली होती. अखेर पोलिसांनी रात्री उशिरा त्याला मैदागिन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल कले. आता त्याची प्रकृती ठीक. खरे तर हा तरूण तपासणी करूनच घरी परतला होता आणि त्याला 14 दिवस क्वारंटाईन राहण्यासही सांगण्यात आले होते. अशोक केसरी, असे या तरूणाचे नाव आहे. तो मुळचा वाराणसी येथील असून सेंट्रल मुंबईतील नागपाडा येथे एका हॉटेलवर तो काम करत होता.
लॉकडाऊनची घोषणा होताच अशोक 14 दिवसांपूर्वी आपल्या मित्रासह मुंईहून निघाला होता. रविवारी सकाळी तो रेल्वे पटरीच्या मार्गाने येथील स्टेशनवर पोहोचला. येथूनच घरच्यांना फोन करून आपण आल्याची माहिती दिली होती. यावेळी त्याने आपल्या सोबत आलेल्या 6 मित्रांसंदर्भातही सांगितले होते. ते पं. दीनदयालनगर आणि रामनगर भागातील आहेत. हे सात जण मुंबईहून आल्याचे समजताच घरच्यांनी शेजारच्यांना याची कल्पना दिली. यामुळे संपूर्ण परिसरात गोंधलाचे वातावरण निर्माण झाले. अशोक तपासणीसाठी बराचवेळ फिरत होता. अखेर त्याला पं. दीनदयाल उपाध्याय जिल्हा रुग्णालयात तपाणी होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर तो तेथे गेला.
अशोक म्हणाला, तपासणीनंतर आपल्याला 14 दिवस घरातच एकांतवासात राहण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर मी घरी पोहोचलो, मात्र आई आणि वहिणींनी दरवाजा उघडला नाही. अशोकला मुंबईतच कोरोनाचा संसर्ग झाला असावा अशे त्यांना वाटते.
मित्रांनाही तपासणी करण्यची सूचना -यासंदर्भात बोलताना, संबंधित पोलीस ठाण्यातील निरीक्षक महेश पांडेय म्हणाले, रुग्णालयातीन तपासणी करून तो घरी पोहोचला होता. मात्र, घरच्यांनी त्याला घरात घेण्यास नकार दिला. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, थकवा आल्याने त्याची प्रकृती खालावली असल्याचे त्यांना समजले. यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यात कोरोनाचे कुठलेही लक्षण नाही. त्याच्या कुटुंबीयांनी ऐकले नाही तर त्याची राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. अशोकच्या मित्रांनाही तपासणी करून घेण्याची सूचना करण्यात आली आहे.