फिरोजाबाद - बोर्ड परिक्षा देण्यासाठी चाललेल्या विद्यार्थिनीची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीची हत्या केल्यानंतर आरोपी तरुणाने त्याच पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. विद्यार्थिनीने आरोपी तरुणाचा प्रेम प्रस्ताव नाकारला होता, ज्यामुळे तरुण नाराज होता. या संतापातच त्याने गोळ्या घालून विद्यार्थिनीची हत्या करत, आपलं आयुष्यही संपवलं. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
विद्यार्थिनी दीपिका यादव केमिस्ट्रीची परिक्षा देण्यासाठी संत घनश्याम इंटर कॉलेज नगला गुलालमध्ये आली होती. त्याचवेळी आरोपी विकास यादव उर्फ विक्की पिस्तूल घेऊन तिथे पोहोचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुार, आरोपी विकासने दीपिकाच्या डोक्यात गोळी घातली, जिथे तिचा जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात हे एकतर्फी प्रेमप्रकरण असल्याचं समोर आलं आहे. आरोपी विकास दीपिकावर लग्नासाठी दबाव टाकत होता. त्याने दोनवेळा तिच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला होता. तेव्हा हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं होतं. मात्र दीपिकाच्या आई-वडिलांना आपण स्वत: हे प्रकरण सोडवू असं सांगितलं होतं.
आरोपी विकासचे वडील शेतकरी आहेत. विकास यादव दिल्लीत ड्रायव्हरची नोकरी करत होता. गेल्याच आठवड्यात तो फिरोजाबादमध्ये आला होता आणि त्याने दीपिकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. विकास खूप हट्टी स्वभावाचा होता असं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे. त्याने गावठी पिस्तूल खरेदी केलं होतं. आपण एका व्यक्तीला मारण्यासाठी जात आहोत असं सांगून तो घराबाहेर पडला होता. जर कोणी माझ्या आणि दीपिकाच्या मधे येण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही मारुन टाकू अशी धमकी त्याने कुटुंबियांना दिली होती.
दीपिकाला इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं होतं. तिचे वडिल एका खासगी कंपनीत कामाला असून आपल्या आई आणि भावंडांसोबत ती राहत होती. घटनेनंतर पोलिसांनी पिस्तूल जप्त केलं असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.