तिरुवनंतपुरम - यंदाच्या पावसाळ्यात आलेल्या महापुरामुळे केरळमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. या महापुरादरम्यान सर्वसामान्यांच्या मदतीसाठी अनेकजण देवदूतासारखे धावून आले होते. त्यांनी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता शेकडो जणांना वाचवून नवा आदर्श निर्माण केला होता. अशा देवदुतांपैकी एक असलेल्या तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. दु:खद बाब म्हणजे केरळमधील महापुरादरम्यान शंभरहून अधिक जणांना वाचवणारा हा तरुण अपघातानंतर रस्त्यावर तडफडत असताना मदतीसाठी कुणीही धावून आला नाही.
जिनेश जेरोन असे या दुर्दैवी हिरोचे नाव आहे. रविवारी घरापासून 12 किमी अंतरावर जिनेशची दुचाकी घसरली. त्यानंतर त्याला मागून येणाऱ्या ट्रकची धडक बसली. या भीषण अपघातात जिनेश गंभीर जखमी झाला. वेदनेने विव्हळत असताना तो येणाऱ्या जाणाऱ्यांकडे मदतीसाठी विनंती करत होता. मात्र अनेक जणांचे प्राण वाचवणाऱ्या या हिरोच्या मदतीसाठी थांबण्याची तसदी कुणी घेतली नाही. अखेर अर्ध्या तासाने एक रुग्णवाहिका तिथे आली. मात्र रुग्णालयात दाखल केल्यावर जिनेशचा मृत्यू झाला. या अपघातावेळी जिनेशसोबत प्रवास करत असलेले जगन सांगतात की," जिनेशसारख्या व्यक्तीसोबत अशी दुर्दैवी घटना घडू शकते यावर माझा विश्वास बसत नाही. त्याला दुसऱ्यांची मदत करणे आवडायचे. त्यामुळेच केरळमधील पुरादरम्यान तो अनेकांची मदत करून हिरो बनला होता." जिग्नेश आणि त्याच्या मित्रांनी पुराने सर्वाधिक प्रभावित झालेल्या चेंगन्नूर परिसरात 100 हून अधिक जणांचे प्राण वाचवले होते. चर्चकडून मच्छिमारांना मदतीसाठी आवाहन करण्यात आल्यानंतर जिनेश आणि त्याच्या सहा मित्रांनी बोट घेऊन मदत कार्यास सुरुवात केली होती.