दिल्लीमेट्रोचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली असताना काही तरुण मेट्रो स्टेशनच्या गेटवरून उड्या मारत बाहेर पडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली आहे.
हा व्हिडीओ दिल्लीतील जामा मशीद मेट्रो स्टेशवरील आहे. १३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून २२ मिनिटांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला होता. दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या रात्री शब-ए-बारात असल्याने गर्दी होती. त्यातच स्टेशनवर एकाच वेळी दोन मेट्रो आल्याने एक्झिट गेटवर लोकांची प्रचंड गर्दी झाली. त्याचवेळी एक्झिट गेटने काम करणं बंद केलं. गर्दी अधिक असल्याने बाजूच्या गेटमधून जाण्याची परवानगी लोकांना देण्यात आली.
याचदरम्यान, काही लोक उड्या मारून गेटच्या बाहेर आले. तसेच गोंधळ घालू लागले. मात्रा काही वेळातच ही गर्दी कमी झाली. तसेच याबाबत कुणीही तक्रार केली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेला व्हिडीओ काही प्रमाणात एडिट करण्यात आलेला आहे. दिल्ली पोलिसांच्या मेट्रो विंगने आपल्याकडे याबाबत आतापर्यंत कुठलीही तक्रारी आलेली नाही, जर तक्रार आळी तर कायदेशीर कारवाईबाबत विचार करू, असे सांगितले.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबाबत दिल्ली मेट्रोकडून अधिकृत माहितीही समोर आली आहे. डीएमआरसी कॉर्पोरेशन संचारचे प्रमुख कार्यकारी संचालक अनुज दयाल यांनी सांगितले की, सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये काही प्रवासी एएफसी गेट पार करून बाहेर जाताना दिसत आहेत. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी रात्री जामा मशीद मेट्रो स्टेशनवर घडली. काही वेळासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. तर काही प्रवासी गेटवरून उड्या मारून जात होते. तिथे सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी पुरेशा प्रमाणात होते. तसे च परिस्थितीही नियंत्रणात होती. तसेच प्रवाशांची ही क्षणिक प्रतिक्रिया होती, असेही त्यांनी सांगितले.