नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देशामध्ये फूट पाडून द्वेष लपवत असल्याचा आरोप केला आहे. तसेच तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरून राहुल गांधी ट्विट करत तरुणांना उद्देशून म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा देशात असलेल्या बेरोजगारी व अर्थव्यवस्थेचे नुकासान केल्यामुळे जनतेच्या मनात असणाऱ्या रागाला सामोरे जाऊ शकत नाही. यामुळेचं ते भारतामध्ये फूट पाडून द्वेष लपवत आहेत. आपण केवळ देशातल्या प्रत्येक भारतीयाविषयी प्रेम व्यक्त करुन नरेंद्र मोदी व अमित शहांचा पराभव करु शकतो, असं राहुल गांधी म्हटलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात हिंसक आंदोलन पेटलं होतं. या आंदोलनात तरुणांचा मोठा प्रमाणात सहभाग होता. महाराष्ट्रात देखील विविध ठिकाणी आंदोलन करत नागरिकत्व कायद्याचा विरोध केला होता.
देशभर पसरत चाललेले आंदोलन पाहून केंद्र सरकारने आता आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी चालविली आहे. आंदोलकांनी पुढे यावे आणि आमच्याशी चर्चा करावी, आम्ही त्यांचे म्हणणे ऐकायला तयार आहोत, अशी भूमिका मोदी सरकारने घेतली आहे. सुधारित नागरिकत्व कायदा केला असला तरी त्याचे नियम तयार झालेले नाहीत. त्यामुळे अंमलबजावणीपूर्वी आम्ही सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकू, असे सरकारने म्हटले आहे. मात्र अशा चर्चेसाठी सरकारने कोणाचीही नियुक्ती केलेली नाही.