नवी दिल्ली : व्हायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी गुरुवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. जगनमोहन रेड्डी यांच्या शपथविधी सोहळ्याला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, डीएमके अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.
आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर जगनमोहन रेड्डी यांनी राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विजयवाडाजवळील आयजीएमसी स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात राज्यपाल ई. एस. एल. नरसिम्हन यांनी जगनमोहन रेडी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी फक्त जगनमोहन रेड्डी यांनी शपथ घेतली असून त्यांचे मंत्रीमंडळ येत्या 7 जून रोजी स्थापन करण्यात येण्याची शक्यती आहे.
तेलुगू देशम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनाही जगनमोहन रेड्डी यांच्या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, एन. चंद्राबाबू नायडू या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. व्हायएसआर काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीत 175 पैकी 151 जागांवर विजय मिळविला आहे. तर लोकसभेसाठी 25 पैकी 22 जागांवर खासदार निवडून आले आहेत.
दरम्यान, बुधवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे त्यांच्या शपथविधीचे कार्यक्रमस्थळ उद्ध्वस्त झाले होते. शपथविधीसाठी घालण्यात आलेल्या मांडव उडून गेला होता. तसेच, ठिकठिकाणी लावलेले बॅनरही फाटले होते. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले होते.