नवी दिल्ली - टोल नाक्यावर अनेक कारणांमुळे कर्मचाऱ्यांशी वाद झाल्याच्या घटना या अनेकदा समोर येत असतात. अशीच एक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. एका महिला नेत्याची मुजोरी पाहायला मिळाली आहे. टोल नाक्यावर गाडी अडवली म्हणून बॅरिकेट्स हटवून महिला नेत्याने रागाच्या भरात कर्मचाऱ्याचा कानशिलात लगावली आहे. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमधील वायएसआरसीपी (YSRCP) च्या महिला नेत्याच्या 'दादागिरी' चा व्हिडिओ समोर आला आहे. डी. रेवती असं त्यांचं नाव असून टोल नाक्यावर त्यांची गाडी थांबवली म्हणून त्या प्रचंड चिडल्या. टोल टॅक्स विचारल्यानंतर महिला नेत्याचा राग अनावर झाला आणि त्यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे. गुंटूर जिल्ह्यात हा प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
पोलिसांनी महिला नेता डी. रेवती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र रेवती यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांनीच गैरवर्तन केल्याचा आरोप लावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्येही अशीच एक घटना घडली होती. ई-पास मागितला म्हणून एका नेत्याने दादागिरी करत पोलिसाला धक्काबुक्की केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.
संतापजनक! ई-पास मागितला म्हणून नेत्याची दादागिरी, पोलिसाला केली धक्काबुक्की
पोलिसांनी नेत्याला ई-पास दाखवण्याची विनंती करताच ते संतापले आणि रागाच्या भरात पोलिसांवरच दादागिरी करण्यास सुरुवात केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं होतं. तामिळनाडूचे खासदार आणि DMK पक्षाचे नेते अर्जुनन यांनी पोलिसांवर दादागिरी केली होती. अर्जुनन आपल्या गाडीतून प्रवास करत असताना ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांच्या एका टीमनं त्यांना थांबवलं. पोलिसांनी सलेम चेक पोस्टवर अर्जुनन यांची गाडी रोखली आणि लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक असणाऱ्या ई-पासची मागणी केली. ई-पास मागताच अर्जुनन यांचा पारा चढला आणि त्यांनी पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. पोलिसाला धक्काबुक्की केली होती.