मुंबई - दिलीप कुमार म्हणजे अभिनयाच्या सल्तनतीचे बेताज बादशहा होते. ते केवळ सर्वश्रेष्ठ अभिनेतेच नव्हते तर अभिनयाची ती एक चालती बोलती संस्था होती. हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास म्हणजे दिलीप कुमार. तो इतिहास अजरामर आहे. त्यामुळे आज ज्यांनी जगाचा निरोप घेतला ते दिलीप कुमार नव्हतेच, ते तर युसूफ खान होते. दिलीप कुमार अमर आहेत!, अशा शब्दात शिवसेनेनं दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून 'बादशहा!' संबोंधित त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झाले आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी ते ९८ व्या वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्वसामान्य चाहत्यांपासून ते दिग्गज सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तशा सूचना दिल्या होत्या.
वयाच्या विशीत युसूफ खान या नावाचा एक तरुण चित्रपटसृष्टीत येतो आणि सरिता स्वतःचा मार्ग स्वतः बनविते त्याप्रमाणे प्रखर आत्मविश्वास, कलेवरील अढळ निष्ठा आणि प्रत्यक्ष काम चोखपणे पूर्णत्वाला नेण्याची जिद्द याची कास धरून आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करतो. दिलीप कुमार हा चित्रपटसृष्टीतील एक चमत्कारच म्हणायला हवा. शंभरीपर्यंत पोहोचतानाच त्यांचे झालेले निधन म्हणजे परिपूर्ण जीवनाची समाप्ती आहे. गेली अनेक वर्षे ते कॅमेऱ्यासमोर आणि पडद्यावर नव्हते. तरीसुद्धा दिलीप कुमार नसलेली हिंदुस्थानी चित्रपटसृष्टी म्हणजे नेहरू-गांधी, ठाकरे, वाजपेयी नसलेले हिंदुस्थानी राजकारण आहे, असे शिवसेनेनं म्हटलं आहे.
दिलीपकुमार हे अजरामर - मुख्यमंत्री
भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलीप कुमार यांच्या आदरांजली वाहिली आहे. तसेच, दिलीप कुमार यांच्या घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शनही घेतले. त्यानंतर, सायरा बानो यांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.
सायंकाळी दफनविधी झाला
पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी 'मुगल-ए-आजम', 'देवदास', 'नया दौर', 'राम और श्याम' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९९८ मध्ये आलेला 'किला' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. बॉलिवूडची पंढरी असलेल्या मुंबईशी दिलीप कुमार यांचं जवळंच नातं आहे. नाशिक, पुणे आणि मुंबई असा दिलीप कुमार यांचा प्रवास. त्यामुळेच, जगप्रसिद्ध असलेल्या लिजेंड भूमिपुत्राचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. दरम्यान, सांताक्रुझ येथील जुहू कब्रस्तान येथे सायंकाळी 5 वाजता दिलीप कुमार यांचा दफनविधी करण्यात आला.