नवी दिल्ली - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मुलाला झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शौर्य असे डोवाल यांच्या मुलाचे नाव असून ते इंडिया फाऊंडेशन थिंकटँकचे प्रमुख आहेत. निमलष्करी दलावर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
43 वर्षीय शौर्य डोवाल यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात येत आहे. शौर्य यांच्या सुरक्षेत एके-47 रायफलधारी कमांडो तैनात करण्यात येतील. विशेष म्हणजे 15 ते 16 रायफलधारी कमांडो 'मोबाईल सुरक्षा कव्हर'सह त्यांच्यासोबत असणार आहेत. शौर्य यांच्याशिवाय पश्चिम बंगालमधील 10 भाजपा उमेदवारांनाही केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे.
दरम्यान, अजित डोवाल यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफ जवानांवर सोपविण्यात आली आहे. गेल्या 4 वर्षांपासून अजित डोवाल यांना ही सुरक्षा देण्यात येत आहे.