अहमदाबाद : गुलबर्ग सोसायटीप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालावर जकिया जाफरी यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने आपल्यावर अन्याय केला असून, या निकालाविरुद्ध आपण उच्च न्यायालयात जाणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. जकिया यांनी इतर ३६ जणांची सुटका केल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, ११ दोषींना जन्मठेप व इतर काहींना केवळ सात किंवा दहा वर्षांची शिक्षा ठोठाविण्यात आली. असे का करण्यात आले हे समजत नाही. हे सर्व लोक गुलबर्ग सोसायटीत हत्याकांड घडवून आणणाऱ्या जमावाचा भाग होते. मग शिक्षेबाबत हा ‘निवडक दृष्टिकोन’ का अवलंबिण्यात आला? शिक्षा खूपच सौम्य न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत या प्रकरणाचा तपास केलेल्या विशेष चौकशी पथकाचे (एसआयटी) वकील आर.सी. कोदेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षा खूपच सौम्य वाटत असल्याने त्यांनी निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली. या प्रकरणातील ११ दोषींना ठोठावलेल्या जन्मठेपेत ‘टील डेथ’ हे उपवाक्य अंतर्भूत करण्यास न्यायालयाने नकार दिल्यामुळे कोदेकर नाराज आहेत. निकाल समाधानकारक नाही. शिक्षा सौम्य व अपुरी आहे. (वृत्तसंस्था)
जाकिया जाफरी उच्च न्यायालयात दाद मागणार
By admin | Published: June 18, 2016 1:32 AM