अलीगड - वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू व इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) संस्थेचा संस्थापक झाकीर नाईक हिरो असल्याची शिकवण अलीगडमधील इस्लामिक मिशन स्कूलमध्ये दिली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रकरण समोर आल्यानंतर आता शाळा प्रशासन झाकीर नाईकचा विषय अभ्यासक्रमातून काढणार असल्याचं सांगत आहे. शिक्षण विभागाचे अधिकारीदेखील प्रकरणाचा योग्य तपास करुन आवश्यक ती कारवाई करणार असल्याचं बोलत आहेत.
अलीगडमधील दोदपूर येथील इस्लामिक स्कूलच्या दुस-या इयत्तेतील विद्यार्थ्यांना इल्म-ए-उन नफे नावाचं पुस्तक शिकवलं जात आहे. या पुस्तकातील 22 व्या धड्याचं नाव हीरोज ऑफ इस्लाम असं आहे. या धड्यात इसरार अहमद, हारून याहया, मौलाना तारिक जमील, एस अब्दुल्ला तारिक, यूसूफ एसेट्स, बिलाल फिलिप, मौलाना कलीम सिद्दीकी, शेख अहमद दीदत यांच्यासोबत झाकीर नाईकचाही उल्लेख करण्यात आला आहे. या पुस्तकात दहशतवाद्यांना पाठिंबा देणा-या झाकीर नाईकचा एक हिरो म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
शाळा व्यवस्थापक शोहिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हे पुस्तक दोन वर्षांपूर्वी छापण्यात आलं होतं. त्यावेळी झाकीर नाईकवर कोणताही आरोप नव्हता. नव्या आवृत्तीत झाकीर नाईकचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे'. जिल्हा शिक्षण अधिकारी धिरेंद्र सिंह यांनी सांगितलं की, 'प्रकरण समोर आलं आहे, चौकशी केल्यानंतर कारवाई करण्यात येईल. सोबतच आपलं पुस्तक छापण्यासाठी शाळेकडे परवानगी होती की नव्हती याचीही चौकशी केली जाणार आहे'.
शाळेची माजी विद्यार्थिनी डेनिशने 2017 मध्ये आपल्याला शाळेत वादग्रस्त झाकीर नाईकसंबंधी शिकवण्यात आलं होतं अशी माहिती दिली आहे.
धार्मिक प्रवचनांच्या नावाखाली कट्टर इस्लामचा प्रचार करत तरुणांची डोकी भडकविण्यासह इतर आर्थिक गुन्ह्यांसाठी भारतातील तपास यंत्रणांना हवा असलेला वादग्रस्त धर्मप्रचारक डॉ. झाकिर नाईक याला कायम वास्तव्याचा परवान्याद्वारे मलेशियाने आसरा दिला आहे. पाच वर्षे मलेशियात राहात असलेल्या झाकिर नाईकने येथे बस्तान बसविले आहे. पंतप्रधानांसह बड्या मंडळींसोबत ऊठबस असलेला नाईक स्वत:हून भारतात परतण्याची किंवा त्याला पाठविले जाण्याची शक्यता नाही.