India On Zakir Naik: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारा फरार झाकीर नाईकला पकडण्यासाठी भारताने फास आवळायला सुरुवात केली आहे. यासाठीच आता भारत सरकारने ओमान सरकारकडे झाकीर नाईकला देशात येऊ देऊ नये, अशी मागणी केली आहे. त्याच्याविरुद्ध प्रत्यार्पणाची विनंती मलेशिया सरकारकडे प्रलंबित आहे. झाकीर नाईकचे 23 आणि 25 मार्च रोजी ओमानमध्ये दोन कार्यक्रम होणार आहेत. याबाबत भारताने ओमान सरकारशी चर्चा केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, असेही सांगण्यात येत आहे की, झाकीर नाईक सध्या ओमानमध्ये नाही. काही वर्षांपूर्वी वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकवर भारतात कारवाई सुरू झाली. यानंतर तो भारत सोडून परदेशात राहू लागला. प्रथम तो ब्रिटनला गेला, तिथे त्याच्या वागणुकीमुळे सरकारने त्याच्या प्रवेशावर बंदी घातली. त्यानंतर झाकीर मलेशियाकडे वळला. गेल्या तीन वर्षांपासून त्याने मलेशियाला आपला तळ बनवले आहे.
झाकीरविरोधात रेड कॉर्नर नोटीसझाकीर नाईक याच्या मागे भारत सरकार बऱ्याच वर्षांपासून आहे. झाकीरवर भारतात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यापूर्वी आणि रेड कॉर्नर नोटीस जारी होण्यापूर्वीच तो देश सोडून मलेशियाला पळून गेला आणि तेथील सरकारी कार्यालये आणि निवासी इमारतींसह व्हीआयपी परिसरात राहू लागला. त्याला भारतात आणण्यासाठी भारताकडून अनेक प्रयत्न झाले आहेत.
काय म्हणाले परराष्ट्र मंत्रालय?झाकीर नाईक एकदा कतारमध्ये फिफा विश्वचषकादरम्यान दिसला होता. त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे एक विधान समोर आले होते, ज्यामध्ये तो फरार असल्याचे म्हटले होते. आता परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, “झाकीर नाईक भारतातील आरोपी आहे. मलेशियातून त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.”