नवी दिल्ली : परकीय देणग्या नियमन कायद्यानुसार (एफसीआरए) अंतिम नोटीस पाठवून वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’ची नोंदणी रद्द करण्याच्या हालचाली केंद्रीय गृह मंत्रालयाने सुरू केल्याने या संस्थेला परदेशांतून मिळणाऱ्या देणग्या बंद होणार आहेत.ही बंदीची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले. ‘आयआरएफ एज्युकेशनल ट्रस्ट’ या नाईक यांच्या संस्थेला पूर्वसंमती वर्गात टाकण्याचीही तयारी सुरू असून, त्यामुळे तसा आदेश निघाल्यावर या संस्थेला पूर्वसंमतीशिवाय परकीय देणग्या स्वीकारता येणार नाहीत.सूत्रांनुसार या दोन संस्थांना मिळणाऱ्या निधीचा उपयोग करून झाकीर धर्मप्रचाराच्या नावाखाली तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादासाठी प्रवृत्त करीत असल्याचे तपासातून दिसून आल्यानंतर ही कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. मजेची गोष्ट अशी की, नाईक यांच्याविरुद्ध अनेक पातळींवर तपास सुरू असूनही ‘एफसीआरए’ कायद्यान्वये ‘आयआरएफ’च्या नोंदणीचे गेल्या सप्टेंबरमध्ये ‘चुकी’ने नूतनीकरण केले गेले होते व त्यासंदर्भात गृह मंत्रालयातील एका सहसचिवास व अन्य चार अधिकाऱ्यांना निलंबितही केले गेले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क) >बंदीचीही कारवाई सुरू ‘बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्या’न्वये नाईक यांच्या ‘आयआरएफ’ संस्थेवर बंदी घालून तिला प्रतिबंधित संघटना म्हणून जाहीर करण्याचाही गृह मंत्रालयाचा विचार आहे. त्यासाठी एक कॅबिनेट टिपण तयार करण्यात आले असून, या प्रस्तावास मंत्रिमंडळाची लवकरच मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. भारतात बंदी असलेल्या ‘पीस टीव्ही’ या दूरचित्र वाहिनीवरून अनेक प्रक्षोभक भाषणे करून तरुणांना दहशतवादासाठी भडकविल्याचा नाईक यांच्यावर आरोप असून, त्यासंबंधीचा तपासी अहवाल महाराष्ट्र पोलिसांनी दिला आहे.
झाकीर नाईकच्या संस्थेच्या परदेशी देणग्या होणार बंद
By admin | Published: November 02, 2016 6:30 AM