- नबीन सिन्हा, नवी दिल्ली
इस्लामचे अभ्यासक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांची वक्तव्ये ही चिथावणीखोर आणि दहशतवादाला खतपाणी देणारी आहेत या निष्कर्षापर्यंत एनआयए आणि आयबी या गुप्तचर व तपास यंत्रणा आल्या असून, एनआयएने इस्लामिक रिसर्च फाउंडेशनची आणि त्यांना मिळणाऱ्या आर्थिक स्रोतांची माहिती मिळविण्यासाठी तपास सुरू केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना डॉ. नाईक यांची भाषणे तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवसेनेने डॉ. नाईक व त्यांच्या संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी नाईक यांचे कार्यालय व निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. बांगलादेशचे माहिती व प्रसारणमंत्री हसनुल हक इनू यांनीही डॉ. नाईक यांची भाषणे व कार्य यांची चौकशी करावी, अशी विनंती भारताला केली आहे. नाईक यांची भाषणे हे आपत्तीजनकच नव्हे, तर देशासाठी भल्याची नाहीत, असे व्यंकय्या नायडू यांनी म्हटले.