ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 13 - इस्लामिक संघर्ष म्हणा अन्यथा मुंडकी छाटू अशी हुर्रियतच्या फुटीरतावादी नेत्यांना धमकी देणारा दहशतवादी झाकीर मुसाने हिजबुल मुजाहिद्दीनबरोबर संबंध तोडले आहेत. आजपासून माझा हिजबुल मुजाहिद्दीनशी काहीही संबंध नाही असे झाकीरने जाहीर केले आहे. फुटीरतवाद्यांबद्दल झाकीरने जे वक्तव्य केले त्याला पाठिंबा द्यायला हिजबुलने नकार दिला. त्यावरुन झाकीर आणि संघटनेमध्ये मतभेद झाल्याने त्याने हिजबुलमधून बाहेर पडण्याची घोषणा केली.
मी ऑडीओ टेपवरुन जो संदेश दिला. त्यामुळे काश्मीरमध्ये गोंधळ निर्माण झालाय. पण मी माझ्या मतांवर ठाम आहे असे त्याने नव्याने सोशल मीडियावर जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे. काश्मीर मुद्याला राजकीय संघर्ष म्हणणे बंद करा अन्यथा तुम्हाला फासावर लटकवू अशी धमकी झाकीर फुटीरतवाद्यांना शुक्रवारी दिली होती.
काश्मीरमध्ये 27 वर्ष जो सशस्त्र लढा चालू आहे, तो इस्लामिक लढा आहे. त्याला राजकीय संघर्षाचे नाव देऊ नका. अन्यथा लाल चौकात तुमची मुंडकी छाटू असे त्याने म्हटले होते. काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांनी इस्लामिक दृष्टीने जी आखणी केलीय त्यात ढवळाढवळ करु नका. तुम्हाला काश्मीरचा संघर्ष राजकीय वाटतो तर, मशिदी. इस्लामिक चिन्ह आणि घोषणांचा वापर करु नका असा त्याने फुटीरतवाद्यांना इशारा दिला आहे. सय्यद अली गिलानी, मीरवाईज उमर फारुख आणि यासीन मलिक हे काश्मीरमधील फुटीरतवादी गटाचे नेते आहेत.
मागच्यावर्षी सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत बुरहान वानी मारला गेला. त्यानंतर काश्मीरमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. आता त्याची जागा झाकीर मुसाने घेतली होती. झाकीर पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे राहतो. जुलै 2016 मध्ये त्याने बंदुक हाती घेतली. त्याआधी त्याने चंदीगड कॉलेजमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.
मी उलेमा नाही. इथले विचारवंत भ्रष्ट आहेत. तुरुंगात रवानगी होईल म्हणून त्यांना मर्यादा ओलांडायला भिती वाटते. त्यामुळेच आम्हाला पुढे यावे लागले आहे असे झाकीर म्हणाला. इथे राजकीय नेते आहेत. ते आमचे नेतृत्व करु शकत नाहीत. आमचा संपूर्ण लढा इस्लामसाठी आहे आणि एकदिवस आम्ही काश्मीरमध्ये शरीयत लागू करु असे झाकीर मुसा म्हणाला.