ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - अल्पावधीतच रिलायन्स जिओनं ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केल्यानंतर इतर कंपन्यांनी त्याचा धसका घेतला आहे. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या नवीन प्लॅन घेऊन येत आहेत. एअरटेल, व्होडाफोन, आयडिया, बीएसएनएलनंतर नार्वेच्या टेलिनॉर कंपनीने त्यांच्या भारतातील सर्कलमध्ये सर्वात स्वस्त डेटा प्लॅन आणला आहे.
जिओला टक्कर देण्यासाठी आणि आपला ग्राहक कायम ठेवण्यासाठी टेलिनॉरने हा डेटा प्लॅन आणला आहे. 47 रुपयांच्या या रिचार्जवर 56 जीबीचा 4G डेटा मिळणार आहे. हा डेटा दररोज 2GBनुसार एक महिन्यासाठी असणार आहे. तसे पाहता टेलिनॉर कंपनीचे फोर-जी नेटवर्क मर्यादित भागातच आहे.
47 रुपयात 56 GB डेटा हा प्लॅन फक्त मोजक्याच ग्राहकांसाठीच आहे. कंपनीमार्फत ज्या मोबाईलवर हा मेसेज जाईल त्याला ह्या प्लॅनचा लाभ घेता येईल. काही ग्राहकांना टेलिनॉरमार्फत मेसेज आले आहेत. त्या मेसेजमध्ये 1GB 4G डेटा फक्त 80 पैशात असे लिहिण्यात आले आहे. मात्र यामध्ये फ्री कॉलिंगचा समावेश नाही.