पणजी - गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान झालेल्या राहुल गांधींसाठी अध्यक्ष होताच हा पहिला पराभव ठरला. निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागल्यानंतर भाजपा नेते विरोधकांना टार्गेट करत भाष्य करत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राहुल गांधींना लक्ष्य करताना आपल्या ओपनिंग इनिंगमध्ये त्यांनी शून्य धावा केल्या असा टोला लगावला आहे. दरम्यान गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे आपण निराश झालो नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे.
भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी ही वेळ साधून मित्रपक्ष शिवसेनेवर टीका केली आहे. 'गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजपा पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेला आत्ता तरी जाग येणार , जमिनीवर येणार, ही देवाला प्रार्थना...' अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. किरीट सोमय्या नेहमीच शिवसेनवर टीका करत असतात. मुंबई महापालिका निवडणुकीवेळीही किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला धारेवर धरलं होतं.
केंद्र आणि गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने गुजरातमधील आपली सत्ता राखण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यावर सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने मिळवलेली आघाडी मोडून काढत भाजपाने 100 हून अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. सध्या आलेल्या कलांनुसार भाजपा 110 तर काँग्रेस 72 जागांवर आघाडीवर आहे.
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात होती. दरम्यान, मतमोजणीला सुरुवात झाल्यावर भाजपाची सुरुवातीची आघाडी मोडीत काढत काँग्रेसने मुसंडी मारल्याने राज्यात मोठा उलटफेर होण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र जसजसे कल स्पष्ट होऊ लागले तशी भाजपाची आघाडी वाढत गेली.
कलांबरोबरच निकालही भाजपाच्या बाजूने जात असून, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सुरुवातीची पिछाडी मोडून काढत विजय मिळवला. नितीन पटेल केवळ 2200 मतांनी विजयी झाले आहेत. दुसरीकडे मोदींविरोधात आघाडी उघडणारे दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनीही दणदणीत विजय मिळवला. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांनीही विजय मिळवला आहे.
182 जागांसाठी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत सरासरी 68.41 टक्के मतदान झाले होते. 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले होते. गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये 42 केंद्रांवर मतमोजणी होत असून, सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदानापूर्वी आलेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता बनेल असा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि गुजरात निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारं त्रिकूट म्हणजे हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी भाजपाच्या पराभवाचा दावा केला आहे. केवळ इव्हीएममध्ये घोळ करूनच भाजपा गुजरातमध्ये विजय मिळवू शकेल आणि 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करेल असा आरोप हार्दिक पटेलने केला होता. ईव्हीएमध्ये गडबड झाली नाही तर भाजपाला 82 जागा मिळतील, असं हार्दिक पटेलने म्हटलं होतं.