नवी दिल्ली : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. इतर काही राज्यांमध्येही संसर्गाचा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) झिका व्हायरसबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये राज्यांना डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ICMR ने सर्व राज्यांना झिकाची चाचण्या वाढवून या संसर्गाबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे.
देशातील बहुतांश राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत हा आजार रोखण्यासाठी पावले उचलली जात आहेत. झिका व्हायरस डासांच्या चावण्याने देखील पसरतो आणि हा व्हायरस पसरवणारे डास पावसात प्रजनन करू शकतात. अशा परिस्थितीत ICMR ने एक नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यामध्ये राज्यांना सांगण्यात आले आहे की, डेंग्यू आणि चिकनगुनियाची लक्षणे असलेल्या रुग्णांची झिका व्हायरसची चाचणी केली जाईल.
झिका व्हायरसची लागण कशी होते?झिका व्हायरसची लागण एडीज डास चावल्याने होते. या डासामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाचाही प्रसार होतो. मात्र, डेंग्यूच्या तुलनेत झिका व्हायरसची लक्षणे सौम्य आहेत. या व्हायरसची लागण गर्भवती महिला आणि त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला होते. हा व्हायरस पहिल्यांदा १९४७ मध्ये युगांडामध्ये आढळला होता.
झिका व्हायरसची लक्षणेझिका व्हायरसची लागण झालेल्या ५ पैकी एका व्यक्तीमध्ये याची लक्षणे दिसतात. व्हायरसने ग्रस्त लोकांमध्ये सांधेदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात. व्हायरसची लागण झालेल्या काहींना रुग्णालयातही दाखल करावं लागतं. ज्या लोकांना या व्हायरसने ग्रासले आहे त्यांनी आराम करणे गरजेचे आहे. याच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, ताप, शरीरावर लाल रंगाचे चट्टेही दिसतात.
बचावासाठी उपाय?- घरात डास होऊ देऊ नका, घरातील स्वच्छतेची काळजी घ्या. मच्छरदानीचा वापर करा. - ज्या ठिकाणी हा वायरस पसरला आहे तेथून प्रवास करुन येणाऱ्या महिलांनी किमान ८ आठवडे गर्भधारणा होऊ देऊ नये. - घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा. - तुम्हाला डायबिटीज, हायपरटेंशन, इम्यूनिटी डिसऑर्डरसारख्या समस्या असतील तर प्रवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.- प्रवास करुन आल्यावर दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.