Zika virus: कोरोनापेक्षा अधिक चिंताजनक ठरू शकतो झिका विषाणू, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 10:42 PM2021-07-15T22:42:25+5:302021-07-15T22:50:08+5:30
Zika virus: एकीकडे केरळमध्ये कोरोना विषाणू थैमान घातल असतानाच आता राज्यामध्ये झिका विषाणूचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत.
तिरुवनंतपुरम - एकीकडे केरळमध्ये कोरोना विषाणू थैमान घातल असतानाच आता राज्यामध्ये झिका विषाणूचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. दरम्यान, मच्छरींच्या माध्यमातून पसरणारा हा आजार कोरोना विषाणूच्या तुलनेत अधिक गंभीर होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे संचालक आणि प्राध्यापक डॉ. नरेश गुप्ता यांनी एएनआयला सांगितले की, या विषाणूची प्रयोगशाळेमध्ये तपासणी झाली पाहिजे. तसेच या विषाणूबाबत आपण गांभीर्याने विचारही केला पाहिजे. हा असा विषाणू आहे जो मच्छरांच्या चावण्यामुळे पसरतो. त्यामुळे जर कुठल्याही राज्याच किंवा प्रदेशामध्ये झिका विषाणूचे रुग्ण सापडले तर त्याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. (Zika virus could be more worrying than corona Virus, experts warn)
दरम्यान, गुरुवारी केरळमध्ये पाच अजून लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. तिरुवनंतपुरममधील नव्या रुग्णांच्या संसर्गाला अलापुझामध्ये नॅशनल इंस्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीच्या स्थानिक केंद्रात चाचणी केल्यानंतर दुजोरा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे झिका विषाणूच्या वाढत्या रुग्णांची संख्या विचारात घेऊन राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी गुरुवारी आरोग्याच्या प्रश्नावर आपातकालिन बैठक बोलावली होती.
झिका विषाणू हा एडिज जातीच्या डासांनी चावा घेतल्याने पसरतो. हे डास डेंग्यू, चिकनगुनियासारखे आजारही पसरवताता. डॉ. गुप्ता यांनी प्रकोपाच्या स्थानिक रूपाचा हवाला देत सांगितले की व्हेक्टर जनित आजार कोविड-१९ च्या तुलनेत अधिक चिंतेचा विषय आहे. मात्र व्हेक्टर नियंत्रणाच्या उपायांनी या आजाराला रोखता येऊ शकते, असे अन्य वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार झिका विषाणू हा डासांमधून निर्माण होणारा प्लेविव्हायरस आहे. हा विषाणू सर्वप्रथम १९४७ मध्ये युगांडामधील माकडांमध्ये दिसून आला होता. त्यानंतर १९५२ मध्ये युगांड आणि टंझानियामध्ये त्याचा माणसाला संसर्ग झाला. आतापर्यंत झिका विषाणूचा संसर्ग हा आफ्रिका, अमेरिका, आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रात दिसून आला आहे.