झिका व्हायरसने वाढवली देशाची चिंता; केरळमध्ये 15 रुग्ण, हायअलर्ट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 03:47 PM2021-07-11T15:47:45+5:302021-07-11T15:49:27+5:30
Zika Virus in India : सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर गंभीरतेने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.
Zika Virus in India : एकीकडे देश कोरोना सारख्या महामारीशी लढत आहे. तर दुसरीकडे धोकादायक झिका व्हायरसचा (Zika Virus) प्रादुर्भावही वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. केरळमध्ये झिका व्हायरसचे 15 रुग्ण आढळून आले आहेत. ANI च्या वृत्तानुसार, केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी (Kerala Health Minister Veena George) यासंदर्भात माहिती दिली. याआधी राज्यात 14 रुग्णांची नोंद होती. आता हा आकडा 15 वर पोहोचला आहे.
राज्य सरकार हाय अलर्टवर
झिका व्हायरसची लक्षणे आणि परिणामांवर काटेकोरपणे लक्ष ठेऊन आहोत. राज्य सरकार हाय अलर्टवर आहे. केरळमध्ये झिका व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी अॅक्शन प्लॅनवर काम केले जात आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर गंभीरतेने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.
पहिला रुग्ण एक गर्भवती महिला होती
केरळमध्ये झिका व्हायरसची लागण होणारी पहिली व्यक्ती गर्भवती महिला होती. महिला आणि तिचे बाळ बरे होत आहेत. झिका व्हायरसचे 19 सॅम्पल पुण्यातील एनआयवीच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यातील 13 सॅम्पल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर आम्ही पुन्हा 14 सॅम्पल टेस्टसाठी पाठवले आहेत. त्यामध्ये ते सर्व निगेटिव्ह आले आहेत, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.
"कोरोनाचा #DeltaVariant सर्वांत धोकादायक, यापासून अमेरिकेसह संपूर्ण जगाने सावध व्हावे"https://t.co/hVeMaIVPif#coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) July 11, 2021
सध्या परिस्थिती नियंत्रणात
आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, राज्य सरकारजवळ झिका व्हायरसवर मात करण्याचा प्लॅन तयार आहे. आम्ही यासाठी पूर्ण तयारी करत आहोत. केंद्र सरकारची टीम राज्यात येऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. परंतु या व्हायरसबाबत भीती निर्माण होण्यासारखे काही नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.