गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, झिम्बाब्वेमधील एक विद्यार्थी गुजरातमध्ये भाजपचा झेंडा हाती घेऊन विधानसभा निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेत आहे. निक कॉम्बॅट असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. निक कॉम्बॅट हा अणंदच्या विद्यानगर येथील एका मंदिरात विधानसभा निवडणुकीविषयी महिलांचे संभाषण लक्षपूर्वक ऐकत असून आपले अनुभव सांगण्यास उत्सुक आहे. यादरम्यान महिला भाजपसाठी मते मागत होत्या. तर निक कॉम्बॅट म्हणाला की, तो भाजप कार्यकर्त्यांकडून बरेच काही शिकत आहे.
निक कॉम्बॅट हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा चाहता आहे. तो अणंद येथील सीव्हीएम कॉलेजमधून मास्टर्स करत आहे. निक कॉम्बॅट याचे भारतावर प्रेम आहे आणि भारताला पुढे नेण्यासाठी त्याचा नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. झिम्बाब्वेचा एकमेव विद्यार्थी निक कॉम्बॅटने वृत्तपत्रात वाचून वंदे भारत ट्रेनची सफर केली आहे. याबाबत तो म्हणाला की, "अलीकडेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंदे भारताचे उद्घाटन केल्याचे वाचले आणि मी त्या ट्रेनमधून प्रवास केला. ही एक अद्भुत ट्रेन आहे आणि खूप स्वच्छ आहे."
जेव्हा निक कॉम्बॅटला विचारण्यात आले की, त्याला भाजपचा झेंडा कोणी दिला, तेव्हा निक कॉम्बॅटने आपल्या धोबीकडे बोट दाखवले. याबाबत निक कॉम्बॅट म्हणाला, "तो (धोबी) भाजपचा कार्यकर्ता आहे आणि तो नेहमी माझ्याशी याबद्दल बोलतो. तो मला सांगतो की, नरेंद्र मोदी जे करतात ते कसे चांगले आहे. तरुणांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासारखे. माझा धोबी सुद्धा स्वत: एक उद्योजक आहे." दरम्यान, सीव्हीएम कॉलेजमध्ये बायोटेक्नॉलॉजीत मास्टर्सचे शिक्षण घेत असलेला निक कॉम्बॅट राजकारणी बनण्याची आकांक्षा बाळगतो. त्याचे दोन मित्र आहेत. यामधील एक आयव्हरी कोस्टचा आणि दुसरा दक्षिण आफ्रिकेचा आहे. या दोघांना राजकारणात फारसा रस नाही. ते केवळ शिक्षणासाठी आले आहेत, असे निक कॉम्बॅट याने सांगितले.
निक कॉम्बॅट म्हणाला की, "मला असे वाटते की मी भारतात विविध संस्कृतींच्या लोकांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी सामाजिक संबंध ठेवण्यासाठी आलो आहे. गुजरातशिवाय मी मध्य प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान आणि महाराष्ट्र अशा आठहून अधिक राज्यांत फिरलो आहे. मी येथे तीन वर्षांपासून राहत आहे." याचबरोबर, भाजपचा झेंडा का घेतला, असे विचारले असता निक कॉम्बॅट याने उत्तर दिले की, "मी हा झेंडा घेतला आहे कारण तो देशातील प्रेम आणि शांततेचे प्रतीक आहे. मला हा ध्वज आवडतो. हा भाजपचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झेंडा आहे."
दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. यासाठी भाजपने देशातील आणि राज्य पातळीवरील सर्व दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लावले आहे. गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता असून, भाजप सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर, काँग्रेस आणि आपही भाजपची सत्ता उलथून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. गुजरात विधानसभेच्या सर्व 182 जागांसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला, दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.