प्रत्येक आयटी इंजिनियरचं स्वप्न असतं की एखाद्या अमेरिकन कंपनीत नोकरी मिळावी आणि आरामात आयुष्य जगावं. मात्र काही आयटी प्रोफेशनल्स पगार आणि स्थितीवरही समाधानी नाहीत. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. अमेरिकेतील चांगली नोकरी सोडून त्यांनी आपल्या गावात येऊन कोट्यवधींची कंपनी उभी केली.
झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी एक सामान्य कर्मचारी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि कोणत्याही निधीशिवाय 39,000 कोटींची फर्म तयार केली. तामिळनाडूचे रहिवासी असलेले श्रीधर वेम्बू मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. विशेष बाब म्हणजे श्रीधर वेम्बू यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण तमिळ भाषेतून पूर्ण केले.
1989 मध्ये आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केल्यानंतर वेम्बू पीएचडीसाठी अमेरिकेला रवाना झाले. अमेरिकेत पीएचडी पूर्ण करून नोकरी करून भारतात परतले. यामुळे त्यांच्या नातेवाईकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, श्रीधर वेम्बू यांना स्वतःचा व्यवसाय करायचा होता, त्यामुळे त्यांनी लोकांचे ऐकण्याऐवजी मनाचं ऐकलं.
गावात बांधलं ऑफिस
1996 मध्ये श्रीधर वेम्बू यांनी त्यांच्या भावासोबत सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट फर्म एडवेंटनेट सुरू केली. 2009 मध्ये या कंपनीचे नाव बदलून झोहो कॉर्पोरेशन करण्यात आले. ही कंपनी सॉफ्टवेअर सोल्यूशन सेवा प्रदान करते.
विशेष म्हणजे त्यांनी आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतेही महानगर निवडलं नाही, तर त्यांनी तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यात आपली कंपनी स्थापन केली. त्यामागे त्यांचा हेतू हा होता की, त्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा व्यवसाय ग्रामीण भागात वाढवायचा होता. श्रीधर वेम्बू यांची इच्छा आहे की ग्रामीण भागातील प्रतिभावान लोकांनी भारताची मुख्य निर्यात असलेल्या IT सेवांमध्ये काम करावे.
श्रीधर वेम्बू हे झोहो कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. DNA च्या रिपोर्टनुसार, या कंपनीचा महसूल $1 बिलियन म्हणजेच 39,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एवढं मोठं स्थान मिळवूनही वेम्बू अत्यंत साधे याहेत. अब्जाधीश उद्योगपती असूनही ते अनेकदा सायकल चालवताना दिसतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.