नवी दिल्ली - महिलांना प्रसूती रजा मिळत असल्याचं सर्वांनाच माहीत आहे. मात्र आता एका कंपनीने पुरुषांना पितृत्व लाभल्यास 26 आठवड्यांची 'पितृत्व रजा' दिली आहे. विशेष म्हणजे ही रजा पगारी असणार आहे. झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीने पुरुषांसाठी 26 आठवड्यांची 'पितृत्व रजा' देण्याचं जाहीर केलं आहे.
सरकारी नियमांप्रमाणे महिलांना बाळंतपणासाठी 26 आठवड्यांची रजा दिली आहे. त्यानंतर आता झोमॅटो या कंपनीने आपल्या पुरुष कर्मचाऱ्यांना 26 आठवड्यांची रजा देण्याची घोषणा केली आहे. झोमॅटोच्या संस्थापकांनी सोमवारी (3 जून) एका ब्लॉगमध्ये याबाबत माहिती दिली आहे. बाळाचा सांभाळ करण्यासाठी आईशिवाय कुटुंबातील इतर नातेवाईकांना देण्यात येणाऱ्या रजेला ‘सेकंडरी केअरगिव्हर लिव्ह’ अर्थात ‘दुय्यम देखभाल रजा’ असे म्हटले जाते. बाळाच्या पित्याला देण्यात येणारी रजाही याच श्रेणीत येते.
झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपेंद्र गोएल यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि पुरुषांसाठी नव्या बाळाचं स्वागत करायला दिलेल्या सुट्ट्यांमध्ये असंतुलन आहे. आम्ही स्त्री कर्मचाऱ्यांना सरकारी नियमांप्रमाणे 26 आठवडे रजा देतोच आहोत. पण आता ही सुविधा पुरुष कर्मचाऱ्यांनाही देत आहे. ही योजना सरोगसी, मूल दत्तक घेणं किंवा समलिंगी पालकांसाठीही असल्याचं त्यांनी सांगितलं. कंपनीच्या वतीने पालकांना आर्थिक मदतही केली जाणार आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जन्मानंतर बाळाचा खूप सांभाळ करावा लागतो. त्या दिवसांत बाळासह आईलाही आपुलकी आणि प्रेमाची आवश्यकता असते. पितृत्व रजा मिळाल्यामुळे जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडता येते. गेल्या काही वर्षांमध्ये विभक्त कुटुंब पद्धती दिसून येत आहे. विभक्त कुटुंब पद्धतील गर्भवती स्त्रीच्या प्रसूतीच्या काळात तिची काळजी घेण्यासाठी कोणी अनुभवी व्यक्ती बरोबर नसते. त्यामुळे तिच्या पतीला मदतीसाठी तिच्याबरोबर राहणे गरजेचे असते. मात्र त्या पुरुष कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजामुळे सुट्टी घेऊन पत्नीच्या मदतीला घरी राहता येत नाही. मातृत्व लाभ अधिनियम लागू असलेल्या खासगी, सरकारी आणि महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती काळात 24 आठवड्यांची रजा देण्यात येते. मात्र पुरुष कर्मचाऱ्यांना या काळात रजा मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होते. त्यामुळेच झोमॅटो कंपनीने पुरुष कर्मचाऱ्यांना 26 आठवड्यांची 'पितृत्व रजा' दिली आहे.