- वैभव देसाईमुंबई: डिलीव्हरी बॉय हिंदू नसल्यानं ऑर्डर रद्द करणाऱ्या ग्राहकाला झोमॅटोनं दिलेल्या सणसणीत प्रत्युत्तरानंतर या वादाला नवी फोडणी मिळाली आहे. सोशल मीडियावर झोमॅटो या प्रकरणावरून ट्रोल झाली असून, ट्विटरवरून त्यांना पाठिंबा देणारे आणि त्यांच्यावर टीका करणारे असे दोन गट पडले आहेत. डिलीव्हरी बॉय हिंदू नसल्यानं जेवण नाकारणाऱ्या ग्राहकाला सुनावल्यानंतर धर्माच्या नावाखाली भेदभाव न करणारी झोमॅटो आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अन्नाला धर्म नसतो, अन्न हाच धर्म' अशा शब्दांत झोमॅटोनं प्रत्युत्तर दिले होतं, त्यानंतर चक्क कंपनीचे संस्थापक दिपेंद्र गोयल यांनीही ट्विटरवरून कंपनीची हीच अधिकृत भूमिका असल्याचं जाहीर केलं होतं. अनेकांनी झोमॅटोच्या या भूमिकेचं सोशल मीडियावर कौतुक केले होते. परंतु काही जणांनी कंपनीवर टीकाही केली आहे. श्रावण सुरू होत आहे. त्यामुळे मुस्लिम डिलीव्हरी बॉयकडून ऑर्डर स्वीकारू शकत नाही. मला पैसे परत नकोत, ऑर्डर रद्द करा,' असे ट्विट अमित शुक्ल याने मंगळवारी रात्री केले होते. आपल्याला एका मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडून खाद्यपदार्थ येणार असल्याचे समजताच त्याने ऑर्डर रद्द करण्याची विनंती केली होती. मात्र 'झोमॅटो'ने 'रायडर' बदलण्यास स्पष्ट नकार दिला. 'झोमॅटो'चे संस्थापक गोयल यांनी 'भारत या संकल्पनेचा, ग्राहक अन् भागीदार यांच्या सौहार्दाच्या नात्याचा आम्हाला अभिमान आहे. तत्त्वांसाठी आम्ही व्यवसायाशी तडजोड करू शकत नाही, तसेच त्याचा आम्हाला खेद नाही,' असे ट्विट केले होते. संवाद व कंपनीची भूमिका व्हायरल होताच असंख्य धर्मनिरपेक्ष लोकांनी कंपनीच्या भूमिकेबद्दल आभारही मानले होते. त्यानंतर हा प्रकार काही तथाकथित हिंदूंनी उचलून धरला असून, झोमॅटो, स्विगी आणि उबर ईट्सला ट्रोल केलं जात आहे. झोमॅटोच्या भूमिकेला स्विगी अन् उबर ईट्सनं ट्विटरवरून पाठिंबा दर्शवला होता. त्यावरूनच त्यांना आता ट्रोल केलं जात आहे. अनेकांनी झोमॅटो, स्विगी आणि उबर ईट्सवर अक्षरशः टीकेची झोड उठवली आहे.
दुसरीकडे त्या जेवणाची ऑर्डर नाकारणाऱ्या व्यक्तीचं ट्विटरवर नाव पंडित अमित शुक्ल असं असून, नमो_सरकार असे तो ट्विटर युजरनेम वापरतो. डिलीव्हरी नाकारणारा ग्राहक पंडित अमित शुक्ल याचेही काही वादग्रस्त ट्विट व्हायरल होत आहेत. त्यानं काही ट्विटमध्ये महिलांवर अश्लील टिपण्णी केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे तो एकंदरीतच कुठल्या मानसिकतेचा असावा, याचा अंदाज बांधणं फारसं कठीण नाही. तर काहींनी झोमॅटोच्या या भूमिकेचं समर्थन करत आभारही मानले आहेत.