ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 17 - फेसबुक या सर्वात लोकप्रिय समाज माध्यमाचा (सोशल नेटवर्किंग साईट) संस्थापक मार्क झुकरबर्ग अल्पावधीतच जगातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांपैकी एक बनला आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला झुकरबर्ग आता राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीस लागला असून, तो 2024 साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचा दावा त्याचे निकटवर्तीय आणि मित्रपरिवाराकडून करण्यात येत आहे.
सध्यातरी झुकरबर्गने राजकारणात सक्रिय होण्याविषयी किंवा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत, पण त्याच्या मित्रांच्या मते त्याच्यामध्ये नैसर्गिक नेतृत्वगुण असून, त्याचा स्वभाव महत्त्वाकांक्षी आहे. एकेदिवशी आपल्याला सम्राट व्हायचे आहे. असे झुकरबर्ग सांगत असतो, असेही फेसबुकमधील काही व्यक्ती सांगतात. यासंदर्भातील वृत्त मेल ऑनलाइन तसेच इतर पाश्चात्य संकेतस्थळांनी दिले आहे.
2024 साली झुकरबर्गला 40वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या वर्षी आपण अमेरिकेतील प्रत्येक राज्यात जाईन, असे झुकरबर्गने आपल्या नोंदवहीत नमूद केले आहे. त्यात झुकरबर्ग म्हणतो, "मी याआधीच अनेक भागात वास्तव्य केले आहे, पण त्यावर्षीचे आव्हान पेलण्यासाठी मला अमेरिकेतील 30 प्रदेशांमध्ये प्रवास करावा लागेल. आता हे आव्हान पेलण्यासाठी मी घराबाहेर पडेन अशी आशा आहे. त्यादरम्यान मी अधिकाधिक लोकांची भेट घेऊन ते कसे जगत आहेत, काय काम करत आहेत, तसेच त्यांची भविष्याबाबत काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेऊ शकेन,"