नवी मुंबई : महापालिकेने जेएनएनयूआरएम अंतर्गत ई-गर्व्हनन्स संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या वार्षिक देखभालीसाठी १ कोटी १३ लाख ३४ हजार रुपये खर्च होणार असून, या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.जेएनएनयूआरएम अंतर्गत विकसित करण्यात आलेली संगणकीय प्रणाली जून २०१२मध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. निविदेमधील अटी व शर्तीनुसार दोष दुरुस्ती निवारण कालावधी संपल्यानंतर दोन वर्षांचा देखभाल व दुरुस्तीचा कालावधी देण्यात आला होता. तो कालावधीही जून २०१५मध्ये संपला आहे. त्यानंतरच्या जुलै २०१५ ते डिसेंबर २०१६ या कालावधीकरिता देखभाल दुरुस्तीसाठी १ कोटी ३६ लाख रुपये खर्चास एप्रिल २०१६ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. ई-गर्व्हनन्स प्रणाली विकसित करणे व त्याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी २००८मध्ये १५ कोटी ११ लाख रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली होती. त्यापैकी ९ कोटी २७ लाख रुपये प्रत्यक्षात खर्च करण्यात आला आहे.ई-गर्व्हनन्स संगणकीय प्रणाली अंतर्गत पालिकेच्या विविध विभागांकरिता संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. सद्यस्थितीमध्ये विविध विभागांचे दैनंदिन काम या प्रणालीद्वारे केले जात आहे. यामध्ये जन्म व मृत्यू नोंदणी, मालमत्ता कर, पाणी देयके, तक्रार निवारण, नगर रचना, अभियांत्रिकी वर्क, परवाना, घनकचरा व्यवस्थापन, लेखा प्रणाली, आस्थापना व वेतन प्रणाली, संकेतस्थळ, स्थानिक संस्था कर, नागरी सुविधा, भांडार, जीआयएस प्रणाली विकसित केली आहे. या कामासाठी १३ सर्व्हर, सॅन स्टोरेज १, राऊटर ३, लोड बॅलन्सर २, फायरवॉल ४, संगणक २००, प्रिंटर्स १०० खरेदी करण्यात आले आहेत. संगणकीय साहित्याचे व संगणकीय प्रणालीचे नियमित देखभाल व दुरुस्ती करणे अत्यावश्यक असते. जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ दरम्यानच्या देखभाल दुरुस्तीसाठी १ कोटी १३ लाख रुपये खर्च होणार असून, त्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
संगणकीय प्रणालीच्या देखभालीसाठी १ कोटी १३ लाख खर्च, प्रस्तावास स्थायी समितीची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 3:54 AM