१ कोटी ४२ लाखाचा ऐवज केला परत, पोलिसांच्या रुपाने ७० कुटुंबांना गणराय पावला
By नामदेव मोरे | Published: August 30, 2022 06:27 PM2022-08-30T18:27:28+5:302022-08-30T18:28:16+5:30
नवी मुंबई परिसरात चोरी, घरफोडी, वाहन चोरीच्या घटना प्रतिदिन घडत आहेत.
नवी मुंबई : परिमंडळ १ परिसरात चोरीला गेलेले दागिने व वाहने पोलिसांनी नागरिकांना परत केली.१० पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील ७० फिर्यादीना तब्बल १ कोटी ४२ लाख रुपयांचे दागिने, वाहने व रोख रक्कम परत करण्यात आले. गणेशोत्सवाच्या एक दिवस अगोदर चोरी गेलेला ऐवज मिळाल्याने नागरिकांनी समधान व्यक्त केले आहे.
नवी मुंबई परिसरात चोरी, घरफोडी, वाहन चोरीच्या घटना प्रतिदिन घडत आहेत. आयुष्यभर बचत करून साठविलेले दागिने, वाहने चोरीला गेल्यामुळे नागरिकांना धक्का बसत असतो. चोरी गेलेला माल परत मिळेलच याची शाश्वती नागरिकांना नसते. परंतु मागील काही वर्षात नवी मुंबई पोलिसांनी हस्तगत केलेला माल सार्वजनीक कार्यक्रम घेऊन सन्मानाने नागरिकांना परत करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी परिमंडळ एक च्या वतीने वाशी मधील साहित्य संस्कृती मंडळाच्या सभागृहात नागरिकांना चोरी गेलेला त्यांचा ऐवज परत देण्यात आला. दहा पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील २३ फिर्यादींना ८३ लाख १४ हजार ९४२ रुपयांचे दागिने व रोख रक्कम देण्यात आली. ४७ नागरिकांना ५९ लाख ७१ हजार रुपये किमतीची त्यांची वाहने परत देण्यात आली आहेत. एकूण ७० जणांना १ कोटी ४३ लाख २६ हजार रुपये किमतीचे साहित्य परत करण्यात आले आहे.
चोरी गेलेले दागिने व वाहने परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी चोरी, घरफोडीसह इतर गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. नागरिकांनीही दक्ष राहून सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त जय कुमार,परिमंडळ एकचे उपायुक्त विवेक पानसरे, साहित्य संस्कृती मंडळाचे पदाधिकारी सुभाष कुळकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.
परत केलेल्या साहित्याचा तपशील
पोलिस स्टेशन - फिर्यादी - परत केलेले दागिने - फिर्यादी - परत केली वाहे
वाशी - ४ - ५५४३००० - ० - ०
एपीएमसी - ७ - १५५५९९० - ४ - १६५०००
रबाळे - ० - ० - ५ - १३५०००
कोपरखैरणे - ४ - ४३५००० - २ - ९५०००
रबाळे एमआयडीसी - २ - १५२००० - ५ - ३०६०००
तुर्भे - ० - ० - १३ - ४२०९५६१
सानपाडा ० - ० - ४ - २३६०००
नेरूळ ४ - १९०००० : ६ - ५३००००
एनआरआय - १ - १३८९५२ - ३ - ९००००
सीबीडी १ - २४०००० - ५ - २०५०००
एकूण २३ - ८२४५९४२ - ४७ - ५९७१५६१