विमानतळामुळे १ लाख रोजगार, मंगलप्रभात लोढा यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 11:37 AM2024-01-17T11:37:41+5:302024-01-17T11:38:07+5:30
स्टार्टअपमध्येही नवी मुंबईला देशात नंबर १ होण्याची संधी असल्याचा विश्वास कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी व्यक्त केला.
नवी मुंबई : देशात सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. नवी मुंबई विमानतळामुळे या परिसरात थेट १ लाख नागरिकांना व ४ लाख जणांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार आहे. स्टार्टअपमध्येही नवी मुंबईला देशात नंबर १ होण्याची संधी असल्याचा विश्वास कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी व्यक्त केला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे निर्माण होणाऱ्या विकासाच्या संधी या विषयावर वाशीच्या सिडको सभागृहात ‘आकांक्षा की उडान’ परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी लोढा यांनी तरुणांनी स्वत:चा व्यवसाय उभारण्यास प्राधान्य द्यावे. नोकरी देणारे तरुण तयार झाले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. यावेळी अदानी एनएमआयएएलचे सीईओ बीव्हीजेके शर्मा यांनी विमानतळामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण परिसराचा विकास झपाट्याने होणार असल्याचे मत व्यक्त केले.
डिसेंबरअखेर पहिल्या टप्प्याचे बांधकाम
एनएमआयएएलचे चारुदत्त देशमुख यांनी म्हटले, विमानतळामुळे हाॅटेल, लॉजिस्टिक, कार्गो पार्क बांधकाम व्यवसायाला गती मिळणार आहे. डिसेंबरअखेर पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी परिषदेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये माजी आमदार संदीप नाईक, नीलेश म्हात्रे, सतीश निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी ऑनलाइन भाषणाद्वारे या उपक्रमाचे स्वागत केले.
दि. बा. पाटील यांचेच नाव
परिषदेमध्ये व्यासपीठावर प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांची प्रतिमा ठेवली होती. विमानतळाला त्यांचे नाव देण्याचा सर्व प्रकल्पग्रस्तांचा आग्रह असून, तो लवकरच पूर्ण होईल, असे सर्वांनीच सांगितले. आमदार गणेश नाईक यांनीही दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्राकडे गेला असून, त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास व्यक्त केला. पहिल्या विमान उड्डाणामध्ये लोकनेते दि. बा. पाटील विमानतळावर आपले स्वागत हे शब्द ऐकण्यास मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.