जिल्ह्यात १० बंदरे धक्क्याला
By admin | Published: February 1, 2016 01:42 AM2016-02-01T01:42:02+5:302016-02-01T01:42:02+5:30
जिल्ह्यातील २३ ठिकाणी लहान मासेमारी बंदर उभारण्याच्या प्रस्तावांपैकी वरसोली आणि करंजा येथील जागेचे प्रस्ताव योग्य असल्याचा निर्वाळा मत्स्य व्यवसाय विभागाने दिला आहे.
आविष्कार देसाई, अलिबाग
जिल्ह्यातील २३ ठिकाणी लहान मासेमारी बंदर उभारण्याच्या प्रस्तावांपैकी वरसोली आणि करंजा येथील जागेचे प्रस्ताव योग्य असल्याचा निर्वाळा मत्स्य व्यवसाय विभागाने दिला आहे. पैकी ११ प्रस्तावात सुचविण्यात आलेल्या जागेमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. त्यामुळे ६४ लाख रुपयांच्या खर्चाची लहान बंदरे सध्यातरी ‘धक्क्याला’ लागली आहेत. उर्वरित १० प्रस्तावांबरोबरच काट मारण्यात आलेल्या ११ ठिकाणी लहान बंदरे विकसित करण्यासाठी मत्स्य विभागाने सर्वेक्षण सुरु केले आहे.
लोकप्रतिनिधींनी विकासकामे सुचविताना कामांबाबत काय नियमावली आहे याची माहिती करुन घेण्याची गरज त्यानिमित्ताने आता समोर आली आहे. मासेमारी करणाऱ्यांना मच्छी सुकविण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होते. मासेमारी व्यवसाय टिकून राहावा, मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होऊ नये यासाठी जिल्ह्यातील समुद्र आणि खाडी किनारी असलेल्या ठिकाणी लहान मासेमारी बंदरांची निर्मिती करण्याची गरज निर्माण झाली. जिल्हा नियोजन समितीमार्फत मच्छी सुकविण्यासाठी मच्छीमार बांधवांना लहान मासेमारी बंदर बांधून देण्याची तरतूद आहे. या वर्षी एक कोटी रुपये मंजूर केले आहेत. स्थानिक पातळीवरची गरज विचारात घेऊन विकासकामे कोठे झाली पाहिजेत यासाठी लोकप्रतिनिधी कामे सुचवितात. त्यानुसार त्यांनी २३ लहान बंदरांच्या निर्मितीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीपुढे ठेवला. यासाठी एक कोटी १४ लाख ६६ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
सुचविण्यात आलेल्या २३ कामांपैकी फक्त अलिबाग तालुक्यातील वरसोली आणि उरण तालुक्यातील करंजा येथील जागा या खारफुटी वनस्पतींच्या क्षेत्राबाहेर आहेत. त्या जागा लहान मासेमारी बंदर बांधण्यासाठी योग्य असल्याने तेथे प्रत्येकी पाच लाख रुपये खर्चाचे लहान मासेमारी बंदर उभारण्यात येणार आहे. उर्वरित बहुतांश जागा या पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या आहेत. त्यामुळे त्या सर्व प्रस्तावांवर पाणी पडले आहे. लोकप्रतिनिधींनी जेथे काम करायचे आहे त्याबाबतच्या नियमावलीचा अभ्यास न करताच प्रस्ताव तयार केल्याचे दिसून येते. अभ्यासपूर्ण कामाची मागणी केल्यास पहिल्याच टप्प्यामध्ये प्रस्ताव मंजूर होऊन कामांना लवकर सुरुवात झाली असती आणि पर्यायाने जिल्ह्यातील विकासकामांनाही गती प्राप्त झाली असती. मात्र दुर्दैवाने तसे झालेले नाही. लहान मासेमारी बंदर बांधण्यासाठी नवीन जागेच्या सर्वेक्षणाचे काम सुरु असल्याचे जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाचे अविनाश नाखवा यांनी सांगितले.लहान मासेमारी बंदरे बांधण्याचे २३ प्रस्ताव प्राप्त झाले होते. मात्र वरसोली, करंजा याच जागा लहान मासेमारी बंदर बांधण्यासाठी नियमांना धरुन आहेत. मत्स्य व्यवसाय विभागाला सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. नंतर निधी वितरीत केला जाईल.
-सुनील जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी, रायगड