नवी मुंबई : चुकीने बँक खात्यात आलेले १० लाख ७४ हजार रुपये परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या विरोधात शनिवारी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीएमसी मधील साखर व्यापाऱ्यासोबत हा प्रकार घडला आहे. ते कर्नाटकच्या कंपनीला पैसे पाठवत असताना चुकीने पुणेच्या एका लॉजिस्टिक कंपनीच्या खात्यात पैसे जमा झाले.
एपीएमसी मधील साखर व्यापारी संजय कोठारी यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांनी कर्नाटक मधून ३१ टन साखर मागवली होती. त्याच्या बिलाची रक्कम १० लाख ७४ हजार रुपये त्यांनी बँकेतून ऑनलाईन ट्रान्स्फर केली होती. मात्र सदर कंपनीला त्यांनी पाठवलेले पैसे मिळाले नसल्याचे समजले. यामुळे त्यांनी बँकेत चौकशी केली असता, चुकीमुळे हि रक्कम पुणेच्या एका लॉजिस्टिक कंपनीच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले.
यामुळे कोठारी यांनी पुणेला जाऊन सदर कंपनीच्या प्रमुखांना याबाबत कळवून त्यांच्या खात्यात चुकीने जमा झालेली रक्कम परत करण्यास सांगितले. परंतु त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांनी रक्कम परत करण्यास टाळाटाळ होऊ लागली. यामुळे कोठारी यांनी एपीएमसी पोलिकडे तक्रार केली असून राहुल प्रभू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.