आंदोलनप्रकरणी दहा जणांना अटक
By admin | Published: February 21, 2017 06:11 AM2017-02-21T06:11:56+5:302017-02-21T06:11:56+5:30
नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेत सोमवारी सकाळी मुलांना शाळेत पाठवू नका
पनवेल : नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेत सोमवारी सकाळी मुलांना शाळेत पाठवू नका, अशी विनंती करून काही जणांनी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापासून अडवले. त्यामुळे काही परिसरात तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापासून अडवणाऱ्या १० पालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. व त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आता राजकीय हस्तक्षेप होऊ लागल्याने निर्णयास विलंब होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेच्या प्रशासनाविरुद्ध राजेंद्र निंबाळकर, मनीषा पाटील, भारत जाधव, राजश्री निंबाळकर, राजेंद्र सालियन व अतुल पवार या पालकांचे उपोषण ५व्या दिवशीही सुरूच आहे. रविवारपासून त्यामध्ये अभविपचे तेजस जाधव व मयूरेश नेतेकर सहभागी झाले आहेत. शाळा प्रशासनाकडून पालकांनी केलेल्या मागण्यांपैकी एकही मागणी मंजूर करण्यात आलेली नाही. तसेच शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारीही टाळाटाळ करीत असल्याने पालकांनी सोमवारी सकाळी साडेसात वाजता शाळा बंद करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिक्षक व पालकांमध्ये झटापट झाली. शाळेत उशीर होत असल्याने काही विद्यार्थ्यांनी भिंतीवरून उडी मारून शाळेत जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी सारिका ढेपे, संध्या गायकवाड, स्नेहा साळवी, प्रतिभा सावंत, मिराज शेख, हर्षल पांडव, वैभव सुरवाडे, उत्तम सुर्वे, सोमेश्वर कोलगे व अभाविपचे कोकण प्रदेश मंत्री प्रमोद कराड यांना ताब्यात घेतले.
मुख्याध्यापिका सईदा जावेद यांनी पालकांविरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाणेत तक्रार केली. आ. प्रशांत ठाकूर, वकील संघटनेचे अध्यक्ष मनोज भुजबळ, माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत यांनी पोलीस निरीक्षक जयराज छापरिया यांचे सोबत चर्चा केली. आमदारांनी शिक्षण उपसंचालक चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यावर शिक्षण शुल्क समितीची ८ मार्चला बैठक होईपर्यंत शाळेचा फी कक्ष बंद ठेवण्याचे आदेश देण्याचे उपसंचालकांनी मान्य केले. आमदारांनी या प्रकरणात लक्ष देण्याची जबाबदारी मनोज भुजबळ यांच्यावर सोपवली आहे.
पालकांचे उपोषण शांतपणे
सोमवारी सकाळी पालकांनी मुलांना शाळेत जाण्यापासून रोखले, त्यामुळे शाळेने पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली. शाळेच्या प्रवेशद्वारावरून पालकांना ताब्यात घेऊन शाळेच्या
तक्र ारीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
- जयराज छापरिया, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खांदेश्वर पोलीस ठाणे
शाळा प्रशासनाने पालकांचे न्याय आंदोलन पोलिसांच्या मदतीने दडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पोलीस ठाण्यात तक्र ार करण्यासाठी विद्यार्थी, तसेच शिक्षकांना समोर करून खोट्या तक्र ारी दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- मनोज भुजबळ