पनवेलमधील १० शाळा होणार बंद!
By admin | Published: February 11, 2017 04:21 AM2017-02-11T04:21:06+5:302017-02-11T04:21:06+5:30
रायगड जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील १२ शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या १०पेक्षा कमी असल्यामुळे त्या बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे
मयूर तांबडे, पनवेल
रायगड जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील १२ शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या १०पेक्षा कमी असल्यामुळे त्या बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याने पालकवर्ग चिंतेत आहे. विद्यार्थ्यांअभावी पनवेल तालुक्यातील मराठी शाळांवर संकट ओढावले आहे.
गतवर्षीपर्यंत पनवेल तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या २६४ शाळा होत्या. त्यातील ५ शाळा विद्यार्थी पटसंख्येअभावी बंद करण्यात आल्या आहेत. यात चाफेवाडी, चिंचवाडी आणि खंगारपाडा, वाघ्राची वाडी, कोंड्याची वाडी या पाच शाळांचा समावेश होता. बंद झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या शाळेत पाठविण्यात आले आहे. त्यामुळे २६४ वरून पनवेलमधील जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या २५९वर आली आहे. पटसंख्या शून्य झाल्यामुळे या शाळा बंद झाल्या आहेत. सद्यस्थितीत आणखी १२ शाळांतील विद्यार्थी संख्या १० पेक्षाही कमी आहे. काही शाळांमध्ये केवळ ३ ते ५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
तालुक्यातील एकूण २१ केंद्रामधील १२ शाळांमध्ये १०पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. त्यामुळे या शाळा बंद झाल्या, तर विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे खेड्यापाड्यातील मुलांचे भवितव्य अंधारमय होण्याची शक्यता आहे.