नवी मुंबई शहरात 10 शाळा अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:42 AM2021-01-16T00:42:43+5:302021-01-16T00:42:53+5:30

संख्या होतेय कमी : या वर्षी होणार दंडात्मक कारवाई

10 unauthorized schools in Navi Mumbai city | नवी मुंबई शहरात 10 शाळा अनधिकृत

नवी मुंबई शहरात 10 शाळा अनधिकृत

Next

योगेश पिंगळे

नवी मुंबई :  शैक्षणिक वर्ष २०२०- २१ या काळात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मान्यता न घेता सुरू असलेल्या १० अनधिकृत शाळा सुरू आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी ऑनलाइन शिक्षण सुरू असून, २०२१- २२ या शैक्षणिक वर्षातील अनधिकृत शाळांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. 

आरटीई अधिनियमानुसार कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही; मात्र तरीही नवी मुंबई शहरातील काही शिक्षण संस्थांकडून प्राथमिक शाळा सुरू असून, विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. या शाळांना मान्यता नसल्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून दरवर्षी शहरातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध होते, तसेच पालकांनी  या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन केले जाते. अनधिकृत शाळांना नोटीस पाठवून संबंधित शिक्षण संस्थांनी शाळेतील विद्यार्थ्यांना  पालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त शाळेत  दाखल करावे आदी निर्देश दिले जातात. दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे गेल्या काही वर्षांपासून शहरातील अनधिकृत शाळांची संख्या कमी झाली आहे. २०२०- २१ या शैक्षणिक वर्षात शहरात १० शाळा अनधिकृत असल्याचे पालिकेने घोषित केले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अद्याप प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या नाहीत; परंतु ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. या वर्षात शहरात किती शाळा अनधिकृत आहेत, याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असून, येत्या काही दिवसांत याबाबत महापालिकेच्या माध्यमातून अनधिकृत शाळांची यादी घोषित केली जाणार आहे.

बोर्डाची परीक्षा देण्यास अडचणी
अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेचे फॉर्म भरता येत नाहीत. त्यामुळे अनधिकृत शाळांमध्ये प्रामुख्याने प्राथमिक वर्ग सुरू केले जातात. यामुळे आठवीतून नववीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो, तसेच या शाळांमधून आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये नववीत प्रवेश घेताना विविध समस्यांचा सामना करावा लागतो.

अनधिकृत शाळांवर होणार दंडात्मक कारवाई
महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन पालकांना केले जाते, तसेच शाळेला याबाबत नोटीस पाठवून शाळा बंद करण्याचे निर्दश दिले जातात. शहरातील अनधिकृत शाळांवर या वर्षांपासून दंडात्मक कारवाईदेखील केली जाणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्षातील अनधिकृत शाळांची यादी जमा करण्याचे काम सुरू आहे. या शाळांकडून दंड वसूल केल्यावर कोणत्या हेडखाली त्याचा भरणा करायचा याची उपसंचालकांकडून माहिती मागवली आहे. 
-  योगेश कडुस्कर (शिक्षण उपआयुक्त, न.मुं.म.पा)

Web Title: 10 unauthorized schools in Navi Mumbai city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.