अवघ्या १० मिनिटांत १०० कोटी मंजूर

By Admin | Published: January 21, 2016 02:38 AM2016-01-21T02:38:34+5:302016-01-21T02:38:34+5:30

पालिकेची आर्थिक स्थिती सुधारल्याने आणि तिजोरीत खणखणाट सुरू झाल्याने नगरसेवकांसह कंत्राटदारांनाही सुगीचे दिवस आले असून निवडणुकांच्या तोंडावर बुधवारी

100 crores approved in just 10 minutes | अवघ्या १० मिनिटांत १०० कोटी मंजूर

अवघ्या १० मिनिटांत १०० कोटी मंजूर

googlenewsNext

ठाणे : पालिकेची आर्थिक स्थिती सुधारल्याने आणि तिजोरीत खणखणाट सुरू झाल्याने नगरसेवकांसह कंत्राटदारांनाही सुगीचे दिवस आले असून निवडणुकांच्या तोंडावर बुधवारी अवघ्या १० मिनिटांत १०० कोटींहून अधिक खर्चाच्या ९८ प्रस्तावांना कोणतीही चर्चा न करता झटपट मंजुरी देण्यात आली.
आजवर राजकीय कुरघोडी, परस्परांना शह-काटशह, गटा-तटांचे राजकारण, पक्षीय अभिनिवेश बाळगत वेगवेगळे प्रकल्प-कामे अडवून ठेवणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी वेगळ्याच एकीचे दर्शन घडवत क्षणार्धात कामे मंजूर करून घेतली. त्यामुळे लवकरच ठाण्यात सर्वत्र विकासाचे वारे वाहू लागेल.
गेली तीन वर्षे प्रभागातील कामे होत नसल्याने आणि मतदारांकडे कोणत्या तोंडाने मते मागायला जायचे, अशा मन:स्थितीत सर्वपक्षीय नगरसेवक सापडले होते. महासभेनिमित्ताने प्रशासनावर आगपाखड करीत सत्ताधारी आणि विरोधक आपसातही भांडताना दिसले. बुधवारच्या महासभेत प्रभाग सुधारणा निधी, दलित वस्ती सुधारणा निधी, गटार, पायवाटा, शौचालय दुरुस्ती आदींसह रस्त्यांचे विविध प्रस्ताव पटलावर आले. या वेळी एकाही प्रस्तावावर वाद न घालता अथवा आपसात न भांडता आयुक्तांच्या कौतुकाच्या मुद्याच्या आड किंबहुना जिभेवर साखर ठेवून आयुक्तांचे तोंडभरून कौतुक करीत केवळ आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून १०१ विषयांपैकी तब्बल ९८ विषयांना अवघ्या १० मिनिटांत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली. त्यामुळे आता नगरसेवकांसह ठेकेदारांचीही दिवाळीआधीच दिवाळी होणार आहे.
मागील तीन वर्षे या ना त्या कारणांमुळे किंबहुना राजकीय राड्यामुळे ठाणे महापालिकेतील नगरसेवक चर्चेत राहिले आहेत. पालिकेची आर्थिक स्थिती ठीक नसल्याने महासभेत प्रशासनावर वारंवार आगपाखड करून कामांसाठी विनवणी केली जात होती.
काही वेळा तर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत हाणामारीचे प्रकारही ठाणेकरांनी पाहिले आहेत. प्रस्ताव मंजूर होवो अथवा न होवो, परंतु आपली ताकद दाखविण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधक एकमेकांवर कुरघोडी करताना दिसले. प्रशासनाने आणलेल्या प्रस्तावांवर आक्षेप घेत विरोधकांनी अनेक वेळा हे प्रस्ताव अडकवून ठेवले. छोटी-छोटी भरपूर कामे
आता एक वर्षावर आलेल्या ठाणे पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागातील कामे कशी पूर्ण होणार, असा प्रश्न पडला होता.
सप्टेंबरमध्ये प्रथमच अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर नव्या वर्षातील पहिल्याच महासभेत शिवाजी रुग्णालयासाठी विविध सामग्री विकत घेणे, सी.आर. वाडिया रुग्णालयात स्त्रियांच्या स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी आवश्यक यंत्रणा खरेदी करणे, शरद पवार स्टेडियमच्या दुसऱ्या टप्प्यातील काम करणे, पालिकेच्या पाच प्रसूतिगृहांत शस्त्रक्रियांच्या सुविधा, एनएसआयसीयू सेवा आदी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
दुसरीकडे गटार, पायवाटा, शौचालयांची दुरुस्ती, सिमेंट रस्ते, यूटीडब्ल्यूटी पद्धतीने नूतनीकरण, नाल्याची भिंत बांधणे, गटार बांधणे, मार्केट, स्मशानभूमीची दुरुस्ती, उद्याने आदींसह दलित वस्ती सुधारणा निधी यासह तब्बल १०१ प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले होते.
स्मशानभूमीचा, स्मार्ट पार्कचा, आरोग्य सेवा, कळवा रुग्णालयासाठी साहित्य खरेदी, भरती प्रक्रियेचा असे महत्त्वाचे आणि किचकट प्रस्तावही पटलावर होते. परंतु, स्मशानभूमीचा प्रस्ताव दप्तरी दाखल करून, भरती प्रक्रियेचा प्रस्ताव फेरसादर आणि जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव वगळता १०१ विषयांपैकी तब्बल ९८ विषयांना अवघ्या १० मिनिटांत मंजुरी देण्यात आली.

Web Title: 100 crores approved in just 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.