नवी मुंबई : माथेरानच्या डोंगराळ भागात प्रमाणाच्या बाहेर पर्ज्यन्यवृष्टी झाली आहे. यामुळे माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या गारबट वाडी भोवती शेतामध्ये ५० ते १०० फुट लांब व ७ ते ८ फुट खोल मोठमोठे चर व खड्डे पडल्याने येथे भितीचे वातावरण पसरले आहे. यामुळे बुधवारी प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितल्यावर जवळपास ३० ते ४० स्थानिकांची माथेरान नगरपरिषदेच्या समाजमंदिराच्या इमारतीत राहण्याची व्यवस्था केली आहे. तर काही जण नातेवाईकांकडे गेले आहेत.
धोका ओळखून गेल्या दोन दिवसांपासून प्रशासन येथील स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करीत होते. मात्र, गावाचा पारंपरिक दुधाचा व्यवसाय असल्याने या ठिकाणी मोठ्याप्रमाणात गायी, म्हशी,मेंढ्यांचे पालन होत असल्याने स्थानिक गाव सोडण्यास नकार देत होते. शेवटी प्रशासनाने स्थानिकांची समजून काढून त्यांना गारबटवाडीतून माथेरान येथे हलविले. यावेळी माथेरानचे अधिक्षक दिशांत देशपांडे, खालापूरचे तलाठी पामपट्टवार, माथेरान पोलिस ठाण्याचे दामोदर खतेले तसेच सह्याद्री आपत्कालीन संस्था ( रेस्क्यु टिम) तसेच आपदा मित्र टिमचे उमेश मोरे, सुनील कोळी, चेतन कळंबे, अक्षय परब, दिनेश सुतार यांनी महत्वाची कामगिरी बजावली.