ब्लास्टिंगमुळे १०० घरांना तडे! नवी मुंबई विमानतळासाठी काम, आंदोलनाचा दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 06:36 AM2022-11-06T06:36:07+5:302022-11-06T06:36:28+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोअर ब्लास्टिंगमुळे भूकंपासारखे हादरे बसत असल्याने वहाळ गावातील सुमारे १०० घरांना तडे गेले आहेत.
मधुकर ठाकूर
उरण :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोअर ब्लास्टिंगमुळे भूकंपासारखे हादरे बसत असल्याने वहाळ गावातील सुमारे १०० घरांना तडे गेले आहेत. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बोअर ब्लास्टिंग बंद न केल्यास विमानतळाचे काम बंद करण्यासाठी ग्रामस्थांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा वहाळ ग्रामपंचायतीने सिडकोला दिला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी सपाटीकरणाचे जोरदार काम सुरू आहे. डोंगर, टेकड्यांचे सपाटीकरण करण्यासाठी बोअर ब्लास्टिंगचा वापर केला जात आहे. यासाठी विमानतळाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा विभागाने कंट्रोल ब्लॉस्ट करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. मात्र, दररोज दुपारच्या वेळी बोअर ब्लास्टिंग करताना शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा अधिक स्फोटकांच्या प्रमाणाचा वापर ठेकेदार कंपनीकडून केला जात आहे.
दररोज ब्लास्टिंगमुळे वहाळ गावातील सर्वच रहिवाशांच्या घरांना मोठ्या प्रमाणावर हादरे बसू लागले आहेत. एखाद्या भूकंपाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर बसणाऱ्या हादऱ्यांमुळे ३०० घरांपैकी सुमारे १०० घरांना तडे गेल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य चेतन घरत यांनी दिली. वहाळ गावातील रहिवासी केसरीनाथ दापोळकर यांच्या आरसीसी घराच्या कॉलमला मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत. घरातील तीनही भिंतीना तडे गेले असल्याने सातत्याने जीव मुठीत धरूनच घरात राहावे लागत आहे. मात्र, भीतीमुळे लहान मुलांना दुसऱ्या घरी पाठविले असल्याची माहिती दापोळकर यांनी दिली.
आशाबाई दापोळकर या विधवेच्या घरातील घर, जिना, लाद्या, सिलिंगला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत. आर्थिक ओढाताण करून बांधलेल्या एकमेव घरात दोन मुलांसह राहते.
दररोज मोठ्या प्रमाणावरील ब्लास्टिंगमुळे वित्त, जीवितहानी होण्याच्या भीतीने घरात नाईलाजाने वास्तव्य करून राहात असल्याची खंतही आशाबाईंनी व्यक्त केली.
‘अधिकाऱ्यांनी पाहणी करावी’
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी सुरू असलेल्या बोअर ब्लास्टिंगमुळे वहाळ गावातील घरांना हादरे बसत आहेत. अनेक घरांना तडेही गेले आहेत. यामुळे वित्त व जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत सिडकोच्या एअरपोर्ट विभाग व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून बोअर ब्लास्टिंग बंद करावे अन्यथा विमानतळाचे कामकाज बंद करण्यासाठी जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला असल्याची माहिती वहाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा पाटील यांनी दिली.
ही बाब गंभीर असल्याने या बोअर ब्लास्टिंगची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत.
- राहुल मुंडके, प्रांताधिकारी