- वैभव गायकरपनवेल : पनवेल महापालिकेचा २०१८-१९ चा सुधारित व २०१९-२०२० चा मूळ अर्थसंकल्प आयुक्त गणेश देशमुख यांनी शनिवारी स्थायी समितीसमोर मांडला. मागील वर्षाच्या २१७ कोटींच्या शिल्लक रकमेसह यंदाच्या सुमारे १०३६ कोटींचा हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात विशेषत: विकासकामांवर भर देण्यात आला आहे.अर्थसंकल्पातील सुमारे ६० टक्के रक्कम विकासकामांसाठी वापरण्यात आली असून पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्वांगीण विकास आयुक्तांनी डोळ्यासमोर ठेवला आहे. प्रथम टप्प्यात पनवेल महापालिका क्षेत्रातील चार गावे स्मार्ट केली जाणार आहेत. पनवेल महापालिका ही मुंबईचे प्रवेशद्वार, मेट्रो सिटीसह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व न्हावा-शेवा पोर्ट परिसरातील विकसित शहर असल्याने संपूर्ण पालिका क्षेत्रात विविध योजना राबवून उत्कृष्ट मेट्रो सिटीचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आयुक्तांनी अर्थसंकल्प तयार केला आहे. पनवेल शहर तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरातील तलावांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. वडाळे, कृष्णाळे तलावाच्या धर्तीवर इस्रायली तलाव विकसित केले जाणार आहेत.कृष्णाळे तलावाजवळील दुकानांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. तसेच आठ कोटी खर्चून रोजबाजार बांधला जाणार असून यात दोन मजल्यावर वाहनांसाठी पार्किंगदेखील केली जाणार आहे. पालिका क्षेत्रात १५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. टप्प्याटप्प्याने पालिका क्षेत्रात वृक्षलागवड केली जाणार आहे.नुकतेच पालिकेला ४० कोटी मुद्रांक शुल्क प्राप्त झाले आहे. दरवर्षी ही रक्कम पालिकेला प्राप्त होणार असल्याने त्या निधीचा विकासकांमध्ये वापर करता येणार आहे. अतिक्र मण रोखण्यासाठी पालिकेच्या मालकीचे मोकळे भूखंड व गुरचरण जागेवरती फेन्सिंग (कुंपण) घालण्यासाठी तीन कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. पाणीपुरवठा, रस्ते, अग्निशमन सेवा, शहर सफाई, आरोग्य, शिक्षण, क्र ीडा, दिव्यांग कल्याण, महिला व बाल कल्याण, वंचित विकास आदीना या अर्थसंकल्पात स्थान देण्यात आलेले आहे.पनवेल महापालिकेच्या मार्फत भविष्यात मुख्यालय साकारले जाणार आहे. सिडकोमार्फत अद्याप पालिकेला मुख्यालयासाठी भूखंड हस्तांतरित करण्यात आलेले नसले, तरी मुख्यालय उभारणीसाठी चार कोटींची टोकन तरतूद करण्यात आली आहे. शिक्षणासाठी २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.स्थायी समितीत हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर सभापती मनोहर म्हात्रे यांनी सभा तहकूब केली आहे. अर्थसंकल्पावर विचारविनिमय करून पुढील सभेत मंजुरीचा निर्णय घेतला जाईल.>पालिका क्षेत्रात पाच बायोगॅस केंद्र उभारणारकचऱ्यावर प्रक्रि या करून त्याच्यातून बायोगॅसची निर्मिती करण्यासाठी पालिका क्षेत्रात पाच बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, याकरिता विशेष तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.>ग्रामीण भागासाठी ३३६ कोटींची तरतूदपालिकेत समाविष्ट पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील २९ गावांना शहराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अर्थसंकल्पात सुमारे ३३६ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे.पहिल्या टप्प्यात चार गावे स्मार्ट करण्यासाठी सुमारे ४६ कोटींचा निधी पालिका खर्च करणार आहे. या व्यतिरिक्त पथदिवे, भुयारी गटारे, रस्ते, पाणीपुरवठा आदीकरिता निधीची तरतूद करण्यात आली आहे.
पनवेल पालिकेचा १०३६ कोटींचा अर्थसंकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 11:21 PM