नवी मुंबई : दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण करून ५० हजारांची मागणी करत मध्यरात्रीच्या सुमारास मुलाला खाडीकिनारी नेऊन सिगारेटचे चटके दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. घरून पैसे घेऊन ये सांगत त्याला त्याच्या सोसायटीखाली सोडले. त्यानंतर मुलाची सुटका झाली.
वाशी सेक्टर १० येथे राहणाऱ्या १६ वर्षीय मुलासोबत हा प्रकार घडला आहे. तो दहावीचा विद्यार्थी असून परीक्षा सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होता. शुक्रवारी मध्यरात्री मित्राने फोन करून त्याला घराखाली बोलावून घेतले. अडीचच्या सुमारास तो मित्रासोबत बोलत असताना गाडीतून आलेल्या काहींनी त्याचे अपहरण करून वाशी गावाच्या जेट्टीवर नेले. तेथे आरोपींनी त्याला मारहाण करत सिगारेटचे चटके दिले. भयभीत झालेल्या मुलाने घरी जाऊन पैसे देतो असे सांगितल्यानंतर सुमारे दीड तासानी त्याला सोसायटीखाली आणून सोडले. आजच्या आज पैसे न दिल्यास दुसऱ्या दिवशी ७० हजार द्यावे लागतील नाहीतर जीव घेतला जाईल, अशी धमकीही आरोपींनी दिली होती.
आईची तब्बेत बिघडली घरी येताच मुलाने पालकांना माहिती दिली. या धक्क्याने त्याच्या आईची प्रकृती बिघडल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल केले. रविवारी संध्याकाळी त्यांनी वाशी पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी प्रवीण केसा, प्रियेश पाटील, उपेश पाटील, गणेश भोईर, सुशील कांबळे, यश सुर्वे, प्रेम राठोड यांच्यावर खंडणी मागितल्याचा व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतरही आरोपी पकडले जातील, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर भटे म्हणाले.