आरोग्य विभागातील ११ कंत्राटी कर्मचारी झाले कायम
By नारायण जाधव | Published: March 4, 2024 08:04 PM2024-03-04T20:04:28+5:302024-03-04T20:04:47+5:30
डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपायांचा समावेश.
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवर “प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज-२ अंतर्गत घेतलेल्या लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई व वाहनचालक या पदांवर करार पद्धतीने मानधन तत्त्वावर घेतलेल्या ११ कर्मचाऱ्यांचे इतर महापालिकांप्रमाणे कायमस्वरूपी समावेशन करण्यात आले आहे. यामुळे या सर्वांना आता कायम कर्मचाऱ्यांचे लाभ देण्यात येणार आहेत.
या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, अशी विनंती आयुक्त केली होती. मानधन तत्त्वावर कार्यरत ११ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या या विहीत प्रक्रियेने झालेल्या आहेत. तसे जाहिरात, लेखीपरीक्षा, मुलाखती घेऊन झालेल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या विनंतीनुसार सर्वांना कायम करण्यास नगरविकास विभागाने सोमवारी मान्यता दिली.
यामध्ये लिपिक संवर्गातील संगीता अरविंद तुपे, सुरेखा पुंडलिक तायडे, सतीश मुकुंद शिंदे, अंजली सुरेश हजारे, नीलेश येसाजी तारमळे, डेटा एन्ट्री ऑपरेटर संगीता सुरेंद्र येरम यांच्यासह वाहनचालक विजय सलमान राठोड आणि शिपाई संवर्गातील अरविंद मुरलीधर कांबळे, तुकाराम यशवंत गांगड, संतोष शांताराम मोरे, प्रेमा वसंत पडधन यांचा प्रामुख्याने समावेश आहे.